पुणे / प्रतिनिधी :
राजस्थान, हरियाणा, पंजाबचा उर्वरित भाग व्यापत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी सहा दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला. सर्वसाधारपणे 8 जुलैला मान्सून देश व्यापत असतो. 8 जूनला केरळात दाखल झाल्यानंतर मान्सूनची सुरुवातीला पूर्व शाखा व त्यानंतर पश्चिम शाखा सक्रिय झाल्याने यंदा नियोजीत वेळेआधीच मान्सूनने देश व्यापला आहे. बिपोरजॉय चक्रीवादळ तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या देशभर सर्वदूर पाऊस सुरु असून, जुलै महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या देशभर मान्सून सक्रिय आहे. उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत ट्रफ आहे. मध्य अरबी समुद्रात तसेच अंदमान समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती सध्या आहे. यामुळे वायव्य भारत वगळता सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे.
महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ; काही भागांत ऑरेंज अलर्ट
राज्यातील काही भागांत ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अतीमुसळधार) मुंबई वेधशाळेने दिला असून, तो पुढीलप्रमाणे
सोमवार ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर
मंगळवार ऑरेंज अलर्ट
पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,
बुधवार ऑरेंज अलर्ट
पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
गुरुवार ऑरेंज अलर्ट
पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी
गोवा, कर्नाटकात ऑरेंज अलर्ट
ट्रफच्या प्रभावामुळे गोवा तसेच कर्नाटकात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला आहे.









