50 जणांनी पोलीसप्रमुखांसमोर मांडले गाऱ्हाणे
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या फोन ईन कार्यक्रमाला शनिवारी उत्तम प्रतिसाद मिळाला. बेळगाव शहरातूनही 13 जणांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडले. गदग जिल्ह्यातूनही नागरिकांनी समस्या मांडल्या आहेत.
शनिवारी सकाळी 9 ते 11 पर्यंत जिल्हा पोलीसप्रमुख व त्यांचे अधिकारी फोन ईन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांचा हा अकरावा कार्यक्रम होता. जिल्ह्यातील विविध भागांतून पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या मांडल्या.
सध्या संपूर्ण पोलीस दल निवडणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त आहे. तरीही वेळ काढून पोलीसप्रमुखांनी फोन ईनचा उपक्रम राबविला. बेकायदा दारूविक्री, जमीनवाद, आर्थिक व्यवहार, वाहनांची चोरी, कौटुंबिक वाद, वाहतुकीची समस्या, मटका, जुगाराविषयी तर तक्रारी आल्याच. याबरोबरच पिण्याचा पाणीपुरवठा, रस्त्याच्या कामांना विलंब आदी पोलिसांच्या कक्षेबाहेरील तक्रारीही नागरिकांनी मांडल्या.
प्रत्येक फोन ईन कार्यक्रमात बेळगाव शहरातील नागरिकही पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडतात. काकती, टिळकवाडी, वडगाव, हिंदवाडी, आंबेवाडी, येळ्ळूर, शहापूर, एपीएमसी, मण्णूर, बसवाण गल्ली, इनामबडस आदी शहर व तालुक्यातील 13 जणांनी पोलीसप्रमुखांसमोर पार्किंगची समस्या, जमीनवाद, खासगी जमिनीत सुरू असलेली दादागिरी, बेकायदा दारूविक्री, कौटुंबिक वाद आदींविषयी तक्रारी मांडल्या.
जिल्हा पोलीसप्रमुखांचे कार्यक्षेत्र बेळगाव शहर व तालुका वगळून आहे. तरीही फोन ईन कार्यक्रमात येणाऱ्या तक्रारींची यादी बनवून पुढील कारवाईसाठी ते पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठवितात. गदग जिल्ह्यातूनही रेशीम उत्पादकांच्या समस्या मांडण्यासाठी पोलीसप्रमुखांना संपर्क साधण्यात आले होते.









