सातारा :
जून महिना सुरू असून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आठवड्याच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेकांनी छत्री, रेनकोट, जर्किन खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. तसेच शेतीच्या पेरण्या पुन्हा रखड्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पाण्याची टंचाई भासू दिली नाही. तसेच नद्या, विहिरी, तलाव, हौद पाण्याने भरून गेले. तोच जून महिना सुरू होताच ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. दरवर्षी जून महिन्यात पाऊस उघडीप देतो आणि जुलै महिन्यात पाऊस पडत असतो. परंतु मे, जून महिन्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात होता. तोच सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळु लागल्या. नंतर पावसाचा जोर वाढत गेला. अर्ध्या तासात सर्वत्र पाणी पाणी झाले. कामावरून घरी जाणाऱ्यांना पावसाने गाठले. यामुळे काही जण भिजत घरी गेले. तर काहींनी आडोश्याला थांबून पाऊस थांबल्याची वाट पाहिली. विक्रेते व ग्राहक यांचीही पळापळ झाली. पावसाचा जोर पाहता अनेकांनी छत्री, रेनकोट, जर्किंग खरेदीला बाजारपेठेत गर्दी केली. पुढे आणखी काही दिवस मुसळधार पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे सुरू झालेल्या खरिपाच्या पेरण्या पुन्हा रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








