गटारी सफाईचे पितळ पडले उघडे : दुकानांमध्ये शिरले सांडपाणी
बेळगाव : शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे बाजारपेठेसह जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे पहावयास मिळाले. सखल भागात पाणी साचण्यासह गटारीतील सांडपाणी दुकानांमध्ये शिरण्यासह रस्त्यावर पसरले. त्यामुळे महापालिकेच्या गटारी सफाईचे पितळ उघडे पडले. सांडपाणी दुकानात शिरू नये, यासाठी व्यापाऱ्यांना कसरत करावी लागली. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असले तरी पावसाने ओढ दिली होती. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. जवळजवळ 90 टक्के धूळवाफ पेरणीचे काम पूर्ण झाले असून शेतकरी आता रोपलागवडीसाठी आवश्यक असलेल्या भाताच्या पेरणीत व्यस्त आहेत. गुरुवारी कोल्हापूरसह निपाणी, संकेश्वर व तवंदी घाटात ढगफुटीसदृश पाऊस झाला.
त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून गुरुवारी रात्री शहरासह तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत वातावरणात प्रचंड उष्मा होता. त्यामुळे दुपारनंतर पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. दुपारी शहर व उपनगराला पावसाने जवळपास तासभर झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. यंदे खूटनजीकच्या बेननस्मिथ शाळेसमोर तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून विद्यार्थी व शिक्षकांना वाट शोधावी लागली. इतकेच नव्हे तर गणपत गल्ली व भोई गल्लीमध्ये गटारीचे सांडपाणी रस्त्यावर आले. सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने काही दुकानांमध्येदेखील पाणी शिरले. त्यामुळे सांडपाणी बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांना कसरत करावी लागली. पावसाळ्यात सांडपाणी व्यवस्थित वाहून जावे, यासाठी महापालिकेकडून नाले व गटारींची सफाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.









