गटार व्यवस्थित न उपसल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी
सांखळी : सांखळी, होंडा परिसराला शुक्रवारी मुळधार पावसाने झोडपले. काही ठिकाणी पडझड झाली तसेच रस्त्याच्या बाजूच्या कडा कोसळून माती रस्त्यावर आली. गटार व्यवस्थित न उपसल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. सध्या सर्वत्रच कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्यांची पातळी बरीच वाढली आहे. सांखळीतील वाळवंटी नदीची पातळी 3 मीटरपर्यंत वाढली असून शुक्रवारी संध्याकाळी बाजारातील पाणी बाहेर फेकण्यासाठी पंपिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पाऊस रात्रभर जोरदारपणे पडतच राहिल्यास साखळीत पुरस्थिती निर्माण होण्याची भीती स्थनिक लोकांनी व्यक्त केली आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलस्रोत खात्याची पुरप्रतिबंधक यंत्रणा सज्ज झाली आहे. साखळी बाजारात साचणारे पाणी पंपिंग करून नदीत फेकण्याची प्रक्रिया सलगपणे हाती घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागात गटारातील पाणी रस्त्यावर
पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, होंडा पंचायत क्षेत्रातील होंडा-फोंडा या मुख्य रस्त्याच्या कडेची गटारे व्यवस्थित न उपसल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.









