नद्यांची पाणी पातळी वाढली. वाळवंटी किनारी पंपींग सुरू. पुरस्थिती मात्र नियंत्रणात.
डिचोली : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढतच असून रविवारी तर पावसाने डिचोली तालुक्मयाला झोडपून काढले. शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे डिचोली व साखळीत पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. डिचोली नदीची पातळी बरीच वाढली होती तसेच साखळीतील वाळवंटी नदीचीही पातळी वाढल्याने बाजारातील नाल्यातील पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. घाटमाथ्यावर पावसाची वृष्टी सुरूच असून नद्यांची पातळी वाढली होतीच. शनिवारी रात्रभर पाऊस सुरूच राहिल्यास साखळी व डिचोलीत पुरस्थिती निर्माण होण्याची शक्मयता होती. त्याप्रमाणेच पावसाची वृष्टी सुरूच राहिल्याने तालुक्मयातील सर्व नदी नाले यामधील पाण्याची पातळी बरीच वाढली होती. सर्व नद्या काठोकाठ भरून वाहत होत्या.
साखळीतील वाळवंटी नदीची पातळी काल रविवारी सकाळी पाण्याने नदीचे काठ ओलांडले होते. नदीची पातळी वाढल्याने तसेच बाजारातील नाल्यात भरणारे पाणी पुन्हा नदीत फेकण्यासाठी पंपींग सुरू करण्यात आले होते. काही वेळानंतर पातळी नियंत्रणात आल्याने सदर पंपींग बंद करण्यात आले होते. तसेच केरी सत्तरी येथील अंजुणे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणातील पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शनिवारी चारही दरवाजे सोडण्यात आले होते. धरण परिसरात पाऊस सुरूच आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. डिचोली तालुक्मयात सध्या पावसाचा जोर सुरूच असल्याने सर्व नदी नाले दुथड्या भरून वाहत आहे. त्यामुळे नद्यांचे परिसर जलमय होऊन पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती मात्र नियंत्रणात असून डिचोली जलस्रोत खात्याचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.









