शुक्रवारी अडीच इंच पावसाची नोंद : तालुक्यात सरासरी 41 इंच : नदी, नाले ओव्हर फ्लो
डिचोली : डिचोली तालुक्याला काल शुक्रवारी (दि.7 जुलै) रोजी दिवसभर पावसाने अक्षरश: झोडपले. दिवसभर दमदार पावसाची बरसात सुरूच राहिल्याने डिचोली, सांखळी व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. तालुक्यातील सर्व नद्या, नाले फुल्ल होऊन वाहू लागले आहेत. वेधाशाळेने गुरुवरी दि. 6 रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी केला होता. परंतु त्याचा डिचोली तालुक्यावर प्रभाव दिसला नाही. मात्र काल शुक्रवारी पावसाने सकाळपासूनच जोर धरला होता. सकाळपासून दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे तालुक्यातील सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. डिचोली व सुखळीतील नद्यांच्या पातळीत वाढ सांखळीतील वाळवंटी नदीला बरेच पाणी आले होते. संध्याकाळी नदीतील पाणी 2.70 मीटर पर्यंत पोहोचले होते. दुपारी नदीला भरती असल्याने पाणी बरेच वाढले होते. नदीतील पाण्याची पातळी नियंत्रणात होती. सांखळी बाजारातील नाल्यात साचणारे पाणी नदीत वाहून जात होते. त्यामुळे पंपिंगची गरज भासली नाही. तर डिचोली नदीतील पाण्याची पातळी 3 मीटरपर्यंत पोहोचली होती. दोन्ही नद्यांमधील पाण्याची पातळी नियंत्रणात असल्याने कोणताही धोका नसल्याचे जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के. पी. नाईक यांनी सांगितले.
सर्वत्र जलमय स्थिती
डिचोली तालुक्यात काल झालेल्या पावसामुळे सर्वत्र जयमय स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या सभोवताली सखल भागात पाणी साचले आहे. साळ नदीतील पाण्याची पातळी बरीच खाली असल्याने सध्यातरी कोणताही धोका नाही. तालुक्यातील संपूर्ण परिस्थितीवर जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के.पी. नाईक यांच्यासह सहाय्यक अभियंता नरेश पोकळे, कनिष्ठ अभियंता विनोद भंडारी हे लक्ष ठेऊन आहेत.
शुक्रवारी अडीच इंच पावसाची नोंद!
यावर्षी पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी सततपणे पडणाऱ्या पावसाने सरासरी गाठली आहे. डिचोली तालुक्यात आतापर्यंत सरासरी 41 इंच इतका पाऊस झाला आहे. त्यात डिचोलीत आतापर्यंत 44 इंच पाऊस झाला आहे. तर शुक्रवारी 3.76 इंच पाऊस पडला आहे. तर सांखळीत आतापर्यंत 42.56 इंच पाऊस झाला आहे. तर काल शुक्रवारी 3.2 इंच पाऊस झाला होता.









