अनेक स्थानी अतिवृष्टीचा इशारा, मदत-बचाव पथके सज्ज, पंतप्रधान मोदींकडून आढावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर भारतात पावसाचा कहर अद्यापही सुरुच असून बळींची संख्या 22 वर पोहचली आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अन्य काही राज्यांमधल्या अनेक स्थानांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन करुन परिस्थितीचा आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. आपत्ती निवारण संस्था आणि केंद्रीय सुरक्षा दलांना सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या असून पुन्हा नंतर पुढील आढावा घेण्यात येणार आहे.
जोरदार पावसामुळे अनेक स्थानी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वाहतुकीचे मार्ग जलमय झाल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडले. अनेक स्थानी वीजपुरवठ्यात व्यत्यय आला होता. झाडे कोसळल्याने लोकांच्या त्रासात भर पडली. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक हानी झाली. पंजाबमधील बियास नदीला पूर आला असून उत्तर प्रदेशात यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उत्तर भारताच्या हिंदी पट्ट्यात पावसाचा जोर विशेषत्वाने असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान मोदींची बैठक
परिस्थितीचे आकलन करुन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आपत्तीनिवारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना परिस्थितीची माहिती देण्यात आली. आपत्कालीन साहाय्यता दलांना सज्जतेचा इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व राज्य सरकारांच्या सतत संपर्कात राहण्याची सूचना पंतप्रधान मोदींनी केली.

उत्तराखंडात पूरस्थिती
गेला आठवडाभर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक स्थानी दरडी कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. पश्चिम उत्तर प्रदेशातही पावसाने जोर धरला आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश आता मान्सूनने व्यापला असून जिल्हा प्रशासनांना दक्षतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हरियाणातील यमुना नदीच्या हाथिनी कुंड परिसरात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात लक्षावधी लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली. या राज्यात 24 जूनपासून पाऊस पडत आहे. गुजरातमध्येही अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याचे दिसून येत आहे.
राजस्थानात कोंडी
सखल भागात पाणी अडकल्याने राजस्थानातील अनेक स्थानी वाहतूक कोंडी झाली. अनेक भागांमध्ये नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अनेक शहरांमध्ये मार्गांवर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वीजपुरवठा खंडित झाला. तेथील सरकारने दक्षतेचा इशारा दिला आहे.
आणखी पावसाचे अनुमान
उत्तर भारतात सर्वत्र आणखी पाच दिवस जोरदार वृष्टी होत राहील, असे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे. आतापर्यंत सरासरीइतका पाऊस झाला असून पुढील काळात तो आणखी कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर आपत्ती निवारणाची सज्जता ठेवण्याचा आदेश देण्यात आला. उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये कोसळणाऱ्या या पावसाचा परिणाम इतर राज्यांवरही होणार असून लवकरच देशभर पावसाच्या सरी कोसळू लागणार आहेत, असे भाकित केंद्रीय पर्यावरण विभागाने सोमवारी व्यक्त केले.









