गारठ्यामुळे शाडू मूर्ती सुकणे कठीण : मूर्तिकारांना उन्हाची प्रतीक्षा : मूर्ती सुकविण्याचा खटाटोप
बेळगाव : गणरायाच्या आगमनासाठी आता केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असला तरी कोसळणाऱ्या पावसामुळे मूर्तिकारांची चिंता मात्र वाढली आहे. विशेषत: शाडूच्या गणेशमूर्ती पावसामुळे सुकत नसल्याने मूर्तिकारांना शेकोटी तसेच आगीची धग देऊन मूर्ती सुकवाव्या लागत आहेत. त्यामुळे मूर्तीच्या रंगकामांना विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 7 सप्टेंबरपासून यावर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार होऊन विक्रीसाठीही आल्या असल्या तरी पारंपरिक पद्धतीने शाडूच्या गणेशमूर्ती अद्याप तयार होत आहेत. शहरातील काही मूर्तिकारांनी आपली मूर्तीकला जिवंत ठेवण्यासाठी शाडूच्याच मूर्ती तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी हे मूर्तिकार शाडूच्याच गणेशमूर्ती तयार करत असतात. बेळगावसह जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरात धुवाधार पाऊस झाला. यामुळे काही मूर्तीशाळांमध्ये पावसाचे पाणीही शिरले. तसेच गारठ्यामुळे शाडूच्या गणेशमूर्ती सुकताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांना शाडूच्या मूर्तींना शेकोटी पेटवून गरम करावे लागत आहे. लाकूड तसेच कोळसा उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी गॅस शेगडीच्या साहाय्याने मूर्ती सुकविल्या जात आहेत.
शाडूच्या मूर्तींना मागणी
गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, सततच्या पावसामुळे शाडूच्या मूर्ती सुकत नाहीत. यासाठी शेकोटी तसेच हॅलोजनचा वापर करावा लागत आहे. मूर्ती सुकल्यानंतरच रंगकाम करावे लागणार असल्याने मूर्ती सुकविण्याचे काम केले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली असल्याने लवकरात लवकर घरगुती गणेशमूर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.
– भरत कुंभार (मूर्तिकार)
काम अंतिम टप्प्यात
मागील अनेक महिन्यांपासून मूर्ती करण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सव महिनाभरावर आल्यामुळे मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर रंगकामाला सुरुवात होणार आहे. परंतु, पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. शाडूच्या मूर्ती लवकर सुकत नसल्यामुळे कोळसा तसेच गॅसशेगडीचा वापर करावा लागत आहे.
– मारुती कुंभार (मूर्तिकार)











