भात पिकाला पोषक वातावरण, बळीराजा सुखावला : भांगलणीच्या कामांना वेग
वार्ताहर/जांबोटी
गेल्या पंधरा दिवसापासून काही प्रमाणात ओढ दिलेल्या मान्सूनच्या पावसाने गेल्या चार दिवसापासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे भात व रताळी पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे वेळेत पुनरागमन झाल्यामुळे या परिसरातील बळीराजा सुखावला आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाने शेतकरी वर्गांना योग्यप्रकारे साथ दिल्यामुळे खरीप हंगामातील भात पिकासह रताळी, नाचणा, भुईमूग आदी पिकांच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या परिसरातील शेतकरी वर्गाने भातरोपाच्या तरुची पेरणी केली होती.
जून, जुलै, महिन्यात देखील या भागात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शेतकरी वर्गाने जुलै महिन्यात भात रोपांच्या लागवडीला प्रारंभ केला होता. ही कामे नागपंचमीपर्यंत पूर्ण झाली. मात्र नागपंचमीनंतर या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतवडीतील नैसर्गिक पाणीसाठा कमी झाल्यामुळे नुकतीच लागवड करण्यात आलेल्या भातरोपावर प्रतिकूल परिणाम झाला होता. काही प्रमाणात भातरोपांची वाढ खुंटली होती. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणांचा (गवताचा) प्रादुर्भाव देखील वाढला होता. शिवाय त्यावर रोगाचा देखील प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनले होते. पिकांच्या पोषक वाढीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते.
आश्लेषा-मघा नक्षत्राच्या पावसाचा जोर
अपेक्षेप्रमाणे आश्लेषा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात व मघा नक्षत्राच्या प्रारंभीच या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे भात व रताळी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शेतवडीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेतकरी वर्गाने यापूर्वीच भात पिकाला रासायनिक खताची मात्रा दिल्यामुळे व सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भात पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या भातपिके बहरली असल्यामुळे या परिसरातील बळीराजा सुखावला आहे. या भागात भांगलणी कामांना वेग आला असून गणेश चतुर्थीपर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे माळणावरील रताळी, भुईमूग आदी पिकांना देखील पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या पिकांच्या फळधारणेला प्रारंभ झाला असून सध्या सुरू असलेला पाऊस रताळी पिकाला उपयुक्त ठरल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे या भागातील मलप्रभा नदी तसेच इतर नदी, नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. पुन्हा पूर आल्यामुळे पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे.









