सांगली :
जिल्ह्यात मागील दोन दिवस कमी झालेला पावसाचा जोर सोमवारी वाढला. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरु राहिली. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. चांदोलीत चोवीस तासात ५९ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात २४.२७ टीएमसी पाणीसाठा झाला असून ते ५९ टक्के भरले आहे.
धरणातून १ हजार ६९० क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणाचा पाणीसाठा ८५.४४ टीएमसी असून ७० टक्के धरण भरले आहे. धरणात ८८ हजार ९१९ क्युसेकने पाण्याची आवक होत असून ७० हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे.
शिराळा तालुक्यात मुसळधार तर वाळवा तालुक्यात पावसाची संततधार सुरु होती. मिरज, पलूस तालुक्यात दिवसभर पावसाच्या सरी बसरत राहिल्या. उर्वरित तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. सांगली शहरात सकाळी जोरदार तर सायंकाळी मध्यम पाऊस झाला.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ६.१ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक २७.२ मि.मी. पाऊस झाला. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २.३, जत २.७, खानापूर-विटा ४.२, वाळवा ६.५, तासगाव ४.४, आटपाडी १.७, कवठेमहांकाळ ७.६, पलूस ६.९ व कडेगाव ४.५ मिमी.








