पणजी : राज्यातील काही भागात काल मंगळवारी पाऊस झाला. सायंकाळी गोवाभर ढगाळ हवामान राहिले. बहुतांश भागात ढगांनी हुलकावणी दिली आहे. वास्को, मडगाव, काणकोण अशा काही मोजक्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. वास्को येथे पहाटे आणि सकाळी मिळून सुमारे एक इंच पावसाची नोंद झाली. मडगावमध्ये पाऊण इंच तर काणकोण येथे एक सेंटिमीटर एवढा पाऊस झाला.
ताळगाव, बांबोळीत बरसल्या सरी
राजधानी पणजीतदेखील अजिबात पाऊस पडला नाही. परंतु ताळगाव व बांबोळी या भागामध्ये मात्र किंचित प्रमाणात पाऊस झाला. वास्को, दाभोळी, सांकवाळ वगैरे भागात सुमारे अर्धा ते पाऊण तास मध्यम प्रमाणात तरी देखील नोंद होईल एवढा पाऊस झाला. इतर भागात कुठे पावसाची नोंद झाल्याचे वृत्त नाही. आजही हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार 10 रोजी किंचित प्रमाणात हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.









