पारा वाढतोय ; उष्म्याबरोबर पावसाची बरसात ; शीतपेयांना मागणी वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पावसाबरोबर उन्हाचा तडाखा शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. दुपारनंतर पावसाला सुरुवात होत असली तरी दुपारपर्यंत वाढत्या उष्म्याने शरीराची लाही लाही होत आहे. त्यामुळे शरीरातील तापमानही वाढत आहे. शहराचा पारा 37 अंशांवर पोहोचला आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने वळिवाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे जनता पावसाने हैराण झाली आहे. पावसापेक्षा विजांचा कडकडाट आणि ढगाचा गडगडाट अधिक असल्याने नागरिक भयभीत होत आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाकादेखील वाढला आहे. त्यामुळे थंड पेयांना मागणी वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी असलेल्या ज्युस सेंटर व कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये गर्दी वाढत आहे. काही ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याने उष्म्यात वाढ होत आहे. वाढत्या उन्हात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबूज, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आइस्क्रीम, ज्युस यासारख्या शीतपेयांना मागणी वाढली आहे.









