कोल्हापूर :
पहाटे पाऊस आणि दिवसभर ढगाळ वातावरण असे वातावरण शनिवारी दिवसभर राहिले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दीड तासानंतर पावसाने विश्रांती घेतली. यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामानातील बदलामुळे नुकत्याच सुरुवात झालेल्या जोरदार थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
बंगलाच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा फटका तामिळनाडू, पद्दूचेरी, कर्नाटकसह दक्षिणेतील अनेक राज्यांना बसला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेले होते. मात्र फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल झाला असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे. तसेच शुक्रवारपासूनच कोल्हापूरात ढगाळ वातावरण होते.
शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. सुमारे दीड तास पावसाच्या सरी कोसळल्या. तर यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तसेच कोल्हापुरात जोरदार वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.








