विजांचा चमचमाट, ढगांच्या गडगडाटासह जोरदार वर्षाव
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सोमवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा व गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्व भागामध्ये सोमवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये वाढ झाली होती. सायंकाळी ढग दाटून आले व सहाच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. बसवण कुडची, निलजी, मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, मोदगा आदी गावांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे बाळेकुंद्री खुर्द येथील आठवडी बाजारामध्ये एकच तारांबळ उडाली. पूर्व भागामध्ये कोथिंबीर पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले असून, कोथिंबीर पिकाला गारांमुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात पावसाचा जोर जास्त नसला तरी विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट व गारांचा वर्षाव मोठ्या प्रमाणावर झाला.









