हवामानात बदल, दैनंदिन जीवनावर परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे. शनिवारी पुन्हा पावसाने शहर परिसरासह उपनगरात हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांचीही तारांबळ उडाली. दररोजच्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.
यंदा डिसेंबर आला तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. ऐन हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. मागील काही दिवसांपासून थंडीही कमी झाली असून ढगाळ वातावरण कायम आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे. शहरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. फेंगल चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
दैनंदिन जीवनावर परिणाम
सततच्या बदलत्या हवामानामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. सकाळी ऊन, दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पाऊस असे विचित्र हवामान पहावयास मिळत आहे. ऐन डिसेंबरमध्ये या बदलत्या हवामानामुळे मानवी जीवनावरही परिणाम होत आहे. विशेषत: आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांची झोप उडाली
ऐन सुगी हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगामातील कामे खोळंबली आहेत. त्यातच अधूनमधून पावसाच्या सरी आणि शिडकावा होत असल्याने कामात अडथळा निर्माण होत आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने सुगी हंगामातील भातकापणी आणि मळणी कामे लांबणीवर पडली आहेत. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.









