जोरदार पावसामुळे बैतखोल येथील डोंगरावरील परिस्थिती धोकादायक
प्रतिनिधी / कारवार
जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यांना पाऊस झोडपून काढीत आहे. तथापि, घाटमाथ्यावरील जोयडा, हल्याळ, दांडेली, मुंदगोड, शिरसी, सिद्धापूर आणि यल्लापूर या सात तालुक्यांत पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. कारवार तालुक्यासह संपूर्ण किनारपट्टीवर संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वात अधिक म्हणजे 142.3 मिमी पावसाची नोंद कारवार तालुक्यात झाली आहे. दरम्यान, कारवार तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने येथून जवळच्या बैतखोल येथील भूदेवी डोंगरावरील परिस्थिती धोकादायक बनून राहिली आहे. डोंगरावरुन पाण्याचे लोंढे वाहत आहेत. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना भूस्खलनाची भीती सतावत आहे. डोंगरावरुन नाविक दलाकडून केल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे भूस्खलन होणार, अशी भीती स्थानिकांनी यापूर्वीच वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.









