विशेष प्रतिनिधी / पणजी
गोव्यात येत्या 29 व 30 मे रोजी विजांच्या गडगडटासह काही भागात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाला अद्याप जोर नाही. पणजीत तर गेल्या 6 महिन्यात पाऊस पडलेला नाही. सांगे, केपे, काणकोण व सत्तरीमध्ये जोरदार पाऊस पडून गेलेला आहे. मात्र मान्सूनपूर्व पाऊस साधारणत: दरवर्षी 15 मे पासून जोरात पडून जातो. यंदा मात्र तो तसा गायबच आहे. येत्या दि. 29 व 30 मे रोजी गोव्यात पाऊस पडणार परंतु तो देखील अवघ्या काही भागातच पडून जाईल, असे हवामान खात्याने सूचित केले आहे.
मान्सून देखील साधारणत: 10 जूनच्या दरम्यान गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. तथापि, हवामान खात्याने राज्यात जोरदार वारे वाहतील असे म्हटले आहे. सध्या समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे 30 मे पर्यंत मच्छीमारी मौसम आहे. परंतु खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सज्जड इशारा हवामान खात्याने मच्छीमारांनना दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 55 कि.मी. पर्यंत जाऊ शकतो असेही हवामान खात्याने म्हटले आहे.









