यमुनेचे पाणी पोहोचले लाल किल्ल्यापर्यंत : दिल्लीतील शाळा रविवारपर्यंत बंद,सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम,पुराच्या पाण्याचे संकट अधिक गडद

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे देशाची राजधानी दिल्लीत यमुना नदीने जलपातळीचे सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्लीमध्ये यमुना नदीलगतच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती लक्षात घेता दिल्लीतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने रविवार, 16 जुलैपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवली आहेत. डीडीएमएच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यासोबतच सरकारी कार्यालयांसाठीही राज्य सरकारने वर्क फ्रॉम होम करण्याची प्रणाली लागू केली आहे. उत्तर भारतात संततधार पावसाने भीषण रूप धारण केले आहे. देशाची राजधानी दिल्लीत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. तब्बल 45 वर्षांनंतर यमुना नदीच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. राजधानी दिल्लीतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती अजूनही कायम आहे. राजधानीत पुराच्या पाण्याचे संकट अधिक गडद झाले असून यमुनेच्या पूरक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना अन्यत्र हलविण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. हथनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुना नदीचे पाणी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या अनेक भागात आल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लाल किल्ल्यापासून ते काश्मिरी गेटवरही पाणी पोहोचले आहे.

विक्रमी पाणीपातळीची नोंद
यमुनेची पाण्याची पातळी बुधवारी, 12 जुलैला रात्री 11 वाजता दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलाजवळ 208.08 मीटर नोंदवण्यात आली. त्यानंतर गुऊवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ती 208.30 मीटरपर्यंत पोहोचली होती. दुपारी 1 वाजून 2 मिनिटांनी 208.62 मीटर एवढी पाण्याची पातळी नोंदवली गेली. गेल्या काही वर्षात नोंदवण्यात आलेली ही सर्वाधिक पातळी असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी 1978 मध्ये यमुनेची पाण्याची पातळी 207.49 मीटरवर गेली होती. दिल्लीतील यमुना नदीकाठच्या भागात पुराचे पाणी शिरले आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली. यासोबतच त्यांनी केंद्राकडेही मदत मागितली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून यमुना नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने जलशुद्धीकरण प्रकल्प बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. काही जलप्रकल्प बंद केल्याने बऱ्याच भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्य राज्यांमध्येही गंभीर परिस्थिती

दिल्लीसोबतच पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे. हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. राज्यात पावसामुळे 88 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 16 जण बेपत्ता असून 100 जण जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या चंद्रतालमध्ये अनेक प्रवासी अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारचे मंत्री जगतसिंह नेगी यांच्यासह प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे बुधवारी केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी भाविकांना हवामान स्वच्छ झाल्यानंतरच येण्याचा सल्ला दिला आहे. उत्तराखंड सरकारने एक हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी गुरुवारी हरिद्वारमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पंजाबमधील 13 जिल्हे पुराच्या तडाख्यात आले असून 479 गावे बाधित झाली आहेत. फिरोजपूरमधील शून्य रेषेजवळ पाकिस्तानचे धरण भरल्यानंतर पाणी भारताच्या सीमावर्ती भागात शिरले आहे. गुऊवारी संपूर्ण पंजाबमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.









