सावळज :
गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वायफळे, यमगरवाडी, बलगवडे परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वायफळे येथे यमगरवाडी रस्त्यावरील अग्रणी नदीवरील पर्यायी रस्ता पुल वाहून गेल्याने दोन्ही गावांचा, परिसरातील वस्त्यांचा संपर्क तुटला होता तर बलगवडे परिसरात तीन बंधारे फुटून पिके वाहून गेली. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. वायफळे येथे यमगरवाडी रस्त्यावर अग्रणी नदीवरील परशीपुलाची उंची वाढवण्याचे काम गेली वर्षभर झाले सुरू आहे.
याठिकाणी फरशीपुल पाडून सात कोटी निधीतुन नवीन उंचीचा पुल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी पाईप टाकून पर्यायी पुल व रस्ता तयार केला होता. मात्र गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदी दुथडी भरून वाहुन पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे वायफळे-यमगरवाडी पर्यायी पुल व रस्ता पहाटे वाहून गेला. त्यामुळे दोन्ही गावांचा व परिसरातील वाडी वस्त्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली. संबंधित ठेकेदार पुलाचे काम संथगतीने करीत असल्यामळे नागरिकांतुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पावसामुळे वायफळे -करंजे रस्त्यावरील पलही रात्री पाण्याखाली गेला होता. बलगवडे येथे कापुर ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येथील ओढ्यावरील तीन बंधारे फुटुन शेतीचे नुकसान झाले आहे. पुराच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱ्यांच्या कडेचा भराव खचन शेतात पाणी शिरले. त्यामळे पिकांसह शेतातील माती वाहून नुकसान झाले आहे. येथील देसाई वस्तीकडे जाणार रस्ता ही पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. कापुर ओढ्यालगत असलेल्या शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे








