नवारस्ता, कराड :
सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना पाणलोट क्षेत्रात अक्षरश: हाहाकार केला आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 91 हजार 271 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाल्याने झपाट्याने धरणात पाणीसाठा वाढत आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 8 फूट, सकाळी 11 वाजता 9 फूट, त्यानंतर दुपारी तीन वाजता 11 फूट आणि सायंकाळी सहा वाजता 12 फूट उचलून तर रात्री आठ वाजता 13 फूट उचलून नदीपात्रात एकूण 93 हजार 300 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर या धरणांतूनही विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा व कोयना तसेच अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी छोटे पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाटण, जावली, महाबळेश्वर, कराड, वाई, सातारा या सहा तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा बुधवार 20 व गुरूवार 21 रोजी बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या आहेत. तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण येथे परिस्थितीनुसार गटविकास अधिकाऱ्यांनी सुटीबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी सूचित केले आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. गेल्या चोवीस तासांपासून तर पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत तुफानी आवक कोयना धरणात सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी प्रारंभी धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे आणि भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आणि कोयना धरणाच्या पाणीपातळीची निर्धारित लेव्हल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना जलसिंचन विभागाने घेतला. त्यानुसार सोमवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रथम दीड फूट, नंतर तीन फूट, रात्री आठ वाजता पाच फूट आणि रात्री अकरा वाजता पुन्हा 8 फूट उचलून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू केला. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने आणि कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाल्याने मंगळवार 19 रोजी सकाळी 8 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 8 फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात 51 हजार 200 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने 11 वाजता पुन्हा सहा वक्र दरवाजे 9 फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात 67 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच राहिल्याने दुपारी तीन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 11 फूट उचलून 80 हजार 500 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला.
मात्र पाणलोट क्षेत्रातील पाऊस काही कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तब्बल 12 फूट उचलून कोयना नदीपात्रात 87 हजार क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक असे मिळून एकूण कोयना नदीपात्रात तब्बल 89 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्री आठला दरवाजे 13 फुटांवर उचलण्यात आले.

- कृष्णा-कोयनेला महापूर
मुसळधार पाऊस आणि विसर्ग यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोयना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा नेरळे पूल, मुळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केला आहे. संगमनगर धक्क्यावर 11 माकडे पाण्यात अडकली होती कराड येथील एनडीआरएफ टीमने या 11 ही माकडांना सुखरूप बाहेर काढले आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 135 मिलिमीटर, नवजा येथे 208 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 91 हजार 271 क्युसेक इतक्या प्रचंड पाण्याची आवक सुरू होती. धरणाची पाणीपातळी 2159.09 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 100.39 टीएमसी झाला आहे.

- …तर पाटण शहरासह अनेक गावांना धोका
कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून कोयना धरणातील विसर्गामुळे कोयना नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. परिणामी नदीकाठच्या पाटण, मंद्रुळ हवेली, नावडी या गावांतील शेतात पाणी शिरले आहे. नेरळे, मुळगाव पुलावर पाणी आल्यामुळे नदीपलीकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. परिणामी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटणमध्ये सध्या स्मशानभूमीला पाणी लागले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पाटण शहरासह अनेक गावांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








