वार्ताहर /येळ्ळूर
काळ्याकुट्ट ढगांनी भरून आलेले आभाळ सोसाट्याचा सुटलेला वारा गडगडणाऱ्या ढगांचा आवाज असे वळीव कोसळणार असल्याचे वातावरण निर्माण झाले असतानाच टपटपणाऱ्या थेंबांचा शिडकाव करत वळीव पावसाने येळ्ळूर परिसराला हुलकावणी दिली. शेतकरी मात्र वळीव कोसळणार या भीतीमुळे धांदल उडाली. सद्या शिवारात कडधान्याची काढणी, मळणी आणि वाळलेली वैरण आणण्याचे काम शेतकरी वर्ग जोरात करीत आहे. चार दिवसापासूनच वातावरणात वळीव कोसळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी जोमाने कामाला लागला होता. सकाळपासूनच वातावरणात वाढलेला उष्मा आणि उन्हाच्या कडाक्यात शांत झालेला वारा बघता आज नक्की वळीव कोसळणार अशी चाहुल लागली होती. आता वळीव पाऊस कोसळणार असे वाटत असतानाच जोराच्या वाऱ्यामुळे ढग विरळ झाले. आणि बघता बघता वळिवाने परिसराला हुलकावणी देत नुसतीच भीती दाखवली.









