त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगला थंडा प्रतिसाद मिळताना दिसत आहे
By : इंद्रजित गडकरी
कोल्हापूर : राज्य शासनाने 29 सप्टेंबर 2016 ला केलेल्या ड नियमावलीनुसार 500 चौरस मीटरवरील बांधकामांसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीची केली. नवीन बांधकाम नियमावलीतही पावसाळी पाणी नियोजनला महत्व दिले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या नियमांतील तरतूदीनुसार पावसाळी पाण्यावर बोअर रिचार्ज केले जातात; मात्र जमिनीखाली खास टाक्या बांधून, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा प्रकार फक्त दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या इमारतींना महापालिकेने घरफाळ्यात सूट दिली असली तरी असा फक्त एकच प्रस्ताव आला आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगला थंडा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. व्यावसायिक तसेच मोठे गृहप्रकल्प वगळता महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला घेण्याचे प्रमाण कोल्हापूर शहरात खूपच कमी आहे.
शहरात मागील वर्षी सुमारे दोन हजार नवीन बांधकामांनी मंजुरी मागितली. त्यातील 1700 हून अधिक प्रस्ताव मंजूर झाले, तर पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी यातील सहाशेपेक्षा कमी प्रस्ताव आले. बांधकाम परवानगी तसेच पुर्णत्वाच्या दाखल्यादरम्यान सोलर एनर्जी, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी नैसर्गिक साधनसामुग्रीचा रोजच्या दैनंदिन जीवनात वापर वाढवणाऱ्या घटकांबाबत अधिक कडक नियमावली करण्याची गरज आहे.
राज्य सरकारने यापूर्वी 6 जून 2007 मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात सर्वात प्रथम अध्यादेश काढला. याबाबतचा नियम आणखी कडक करीत 2016 मध्ये ड वर्ग नियमावलीत (नियम क्रमांक 34 नुसार) 500 चौ.मी. पेक्षा मोठ्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले. नवीन इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या अटीवर बांधकाम परवानगी दिली जाते.
जमिनीखाली पाण्याची टाकी बांधणे, विहीर किंवा बोअरमध्ये इमारतीतील पावसाचे पाणी सोडणेइमारतीभोवती सात मीटर खोल खड्डा काढून त्यावर दगड, विटा, वाळू आदी थर रचून पाणी जमिनीत मुरविणे आदी प्रकाराने पावसाळी पाण्याचा वापराचे नियम सांगितले आहेत.
रेनवॉटर हार्वेस्टिंग नियमितपणे सुरू न ठेवल्यास महापालिका एक हजार चौरस फुटला एक हजार रुपयांपर्यंत दंड लावू शकते. नियमात नमूद केल्याप्रमाणे बोअरवेलमध्ये पावसाळी पाणी सोडले जाते. विशिष्ट प्रकारच्या पाण्याच्या टाकी बांधून रेनवॉटर हार्वेस्टिंग ठरवून करण्याचे प्रमाण दोन टक्के असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जुन्या इमारतींमध्ये जाणीवपूर्वक रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जलसमृध्द कोल्हापुरात सरासरी वर्षाला 1800 मिलीमिटर पावसाची नोंद होते. जगात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजीला (वार्षिक 11 हजार मि लीमिटरपेक्षा जास्त) पडतो. इतका प्रचंड पाऊस पडूनही चेरापुंजीला पावसाळी पाणी संधारणाची आणि नियोजनाची प्रभावी योजना नसल्याने तिथेही अनेकवेळा पाणीटंचाई होते.
अशीच परिस्थिती आज निसर्गाचा वरदहस्त असलेल्या राज्यातील अनेक जिह्यात आहे. ती कोल्हापूरवर आता येवू लागली आहे. मागील पंधरा दिवसांपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहण्याची वेळ यंत्रणेवर आली. धरणसाठ्यातील पाणी पातळी खालावल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष झाले होते.
त्यामुळे उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण हा पाणी टंचाईच्या समस्याचक्रातील कळीचा मुद्दा आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळीसह जिह्याची पाणीभरण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगचे फायदे पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर अवलंबित्व कमी होते.
पाणीपुरवठ्याला स्वयंपूर्णता प्रदान करते. भूजल उपसण्यासाठी लागणारा खर्च कमी होतो. उच्च दर्जाचे, सौम्य आणि कमी खनिजे असलेले पाणी मिळते. शहरी भागात मातीची धूप कमी होते. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी विजेची बचत होते, पाण्याचा दर्जा सुधारतो, जमिनीची धूप रोखण्यास मदत, सोपी पद्धतीमुळे इतर वापरासाठी पाण्याचा वापर, बोअर विहिरी यांचे पुनर्भरण करण्यास मदत, त्यायोगे जमिनीखालील खाऱ्या व क्षारयुक्त पाण्याची तीव्रता कमी होते, शास्त्रीय पद्धतीने साठवणूक केल्यास वर्षभर पिण्यासाठी पुरेल इतका पाणीसाठा करणे सहज होते.
पाणी साठवणुकीची प्राचीन पध्दती छत, उद्याने, महामार्ग, मोकळ्या जागा इत्यादींमधून वाहून जाणारे पावसाचे पाणी गोळा करून साठवले जाते. या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने भूजल साठवणे किंवा पुनर्भरण करणे यालाच रेन वॉटर किंवा रेनफॉल वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात.
चीनमध्ये पावसाचे पाणी 6,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात असावे. किमान 4,000 वर्षांपूर्वीचे पावसाचे पाणी साठल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. पृष्ठभागावरील पाणी संकलन प्रणाली, छप्पर प्रणाली, जमिनीतील टाक्या, धरण, पाणी साठवण जलाशय आदी प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंगव्दारे पाणी साठवणूक केली जाते. घरगुती, शेती आणि भूजल पुर्नभरणासाठी रेनवॉ टर हार्वेस्टिंगचा उपयोग होतो.








