वृत्तसंस्था/ कोलंबो
पाकचा क्रिकेट संघ सध्या लंकेच्या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकने लंकेचा पराभव करत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील येथे सुरू झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अडथळा आणल्याने केवळ 9.5 षटकांचा खेळ झाला.
या दुसऱ्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा पहिला डाव 166 धावात आटोपला होता. त्यानंतर पाकने दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 145 धावा जमवल्या होत्या. या धावसंख्येवरून पाकने मंगळवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि 9.5 षटकांमध्ये त्यांनी 2 बाद 178 धावापर्यंत मजल मारली. पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी खेळ थांबवला. दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये 43 मिनिटामध्ये पाकने 33 धावा जमवल्या. सलामीचा अब्दुल्ला शफीक 2 षटकार आणि 8 चौकारासह 87 तर बाबर आझम 1 षटकार आणि 3 चौकारासह 28 धावावर खेळत होते.. पाकने लंकेवर 12 धावांची नाममात्र आघाडी मिळवली आहे. तत्पूर्वी लंकेच्या पहिल्या डावात पाकचा फिरकी गोलंदाज अब्रार अहमदने 4 गडी तर नसीम शहा आणि शाहिन आफ्रिदी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते. या मालिकेतील गॅलेची पहिली कसोटी पाकने 4 गड्यांनी जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 48.4 षटकात सर्वबाद 166, पाक प. डाव 38.3 षटकात 2 बाद 178 (शफीक खेळत आहे 87, इमाम उल हक 6, शान मसूद 51, बाबर आझम खेळत आहे 28, अवांतर 6, असिता फर्नांडो 2-51).









