पावसाच्या भीतीने वीट व्यावसायिकांची तारांबळ
वार्ताहर/धामणे
तालुक्यातील देसूर येथे दि. 25 रोजी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून सायंकाळी वादळी सोसाट्याचा वारा सुटला होता. तरीही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे येथील वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. देसूर येथे वीट व्यवसाय बऱ्याच प्रमाणात चालतो. त्यामुळे आता वीट काढण्याचे काम जोमाने सुरू असून मंगळवार दि. 25 रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होवून सायंकाळी वळीव पावसाचे शिंतोडे या भागात आल्याने येथील वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कारण कच्च्या विटा काढून ठेवण्यात आल्या आहेत आणि कच्च्या वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात लावल्या आहेत. पावसाच्या भीतीमुळे कच्च्या विटांच्या भट्टीवर व काढून ठेवलेल्या विटांवर ताडपत्री झाकण्यासाठी वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाल्याचे वीट व्यावसायिकांनी सांगितले. वीट व्यावसायिकांचे पाऊस मोठा पडला असता तर नुकसान झाले असते. कच्च्या विटा पावसामुळे विरघळून चिखल निर्माण होतो. त्यामुळे विटा काढलेली मजुरी द्यावीच लागते आणि पावसाच्या हुलकावणीमुळे ताडपत्री व प्लास्टिक मोठे कागद खरेदीचा खर्च त्यामुळे वीट व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते, असे वीट व्यावसायिकांनी सांगितले.









