कोल्हापूर :
शाळा, महाविद्यालयीन परीक्षा संपल्या की बहुतांश मुलांसह तऊणाईचा मोर्चा विविध खेळ खेळण्यासाठी मैदानाकडे वळत असतो. रोज हजारो मुले आपआपल्या भागातील महात्मा गांधी मैदान, दुधाळी, तपोवन, पेटाळा, राजारामपुरीतील नऊ शाळा मैदान, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, राजोपाध्येनगर मैदान, आपटेनगर मैदान यासह ठिकठिकाणच्या लहान मैदानात सकाळी व सायंकाळी क्रिकेट, फुटबॉल खेळताना दिसत होते. परंतू गेल्या 8 दिवसांपासून सुऊ असलेल्या मान्सून पुर्व पावसामुळे मैदानांत पाणी साचून राहिले आहे. चिखलही मोठ्या प्रमाणात तयार झाला. त्यामुळे मुलांसह तऊणाईला घरीच थांबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. मैदानात पावसामुळे जाता येत नसल्याने लहान मुलांच्या माना पुन्हा मोबाईलमध्ये झुकल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील आकाराने सर्वात मोठे असलेले गांधी मैदानात सर्व बाजूंनी पाच फुटापर्यंत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे मैदानाला एखाद्या तलावासारखे स्वऊप प्राप्त झाले आहे. आकाशातून भ्रमंती करणारे पक्षी मैदानात साचलेल्या पाणीभोवतीने जमू लागले आहे. बदके तर प्रत्यक्ष पाण्यात विहार करताना दिसत आहेत. तसेच मैदानात खेळ खेळत बागडणाऱ्या मुलांना, तऊणाईला घरी थांबून रहावे लागले आहे. ठिकठिकाणच्या मैदानांमध्ये होणारी उन्हाळी शिबीरेही केवळ आणि केवळ पावसामुळे स्थगित ठेवली आहे. असे एकीकडे विदारक चित्र असले तरी दुसरीकडे काही मुले दुपारच्या वेळेत आपआपल्या भागातील मोठ्या रस्त्यावरच क्रिकेट खेळत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत आहेत.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने राजाराज कॉलेज मैदान, शाहुपरी जिमखाना, शासकीय तंत्रनिकेतन मैदानात आयोजित केल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना थांबवण्यात आले. शिवाय आणखी आठ दिवस स्पर्धांमधील सामने खेळवता येणार नाहीत, अशी मैदानाची पावसामुळे अवस्था झालेली आहे. राजाराज कॉलेज मैदान, शाहुपरी जिमखाना, शासकीय तंत्रनिकेतन मैदान या तिनही मैदानांमधील आऊट फिल्ड मातीने तयार केले. त्यामुळे या मैदानात पाच मिनिटे जरी खेळले तरी मोठ्या प्रमाणात चिखलाचे सम्राज्य तयार होणार आहे. याच कारणांमुळे महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहीत करणाऱ्या “लक्ष्मी रंगराव कंरडक“ महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेचा लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघ व महाराणी प्रमिलाराजे महिला संघ या संघात होणारा अंतिम सामना स्थगीत ठेवला आहे. माजी आमदार दिनकरराव यादव चषक अ गट क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंसह अंतिम सामनाही थांबला आहे. इतकेच नव्हे तर चिखलाचे साम्राज्य तयार होऊन मैदानाची मातीची ठेवण ओबड धोबड होऊ नये म्हणून मैदानात कोणाला सोडले जात नाही आहे.
- खेळासह मॉर्निंग वॉकवरही परिणाम…
संपूर्ण राजोपाध्येनगरातील मुले व तऊणांना खेळण्यासाठी महापालिकेच्या कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयासमोरील राजोपाध्येनगर मैदान हे एकमेव हक्काचे मैदान आहे. या मैदानात उन्हाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणात मुले–तऊण विविध खेळ खेळताना दिसतात. यात मैदानात मंडळाकडून क्रिकेट, फुटबॉल स्पर्धाचेही आयोजन केले जाते. शेकडो ज्येष्ठ महिला व पुऊषांसह तऊणाई मॉर्निंग वॉक करायला याच मैदानात येत असतात. मैदान विकसित करा अशी भागातील खेळाडूंची मागणी आहे. असे सगळे पहायला मिळत असतानाच पावसाने खेळाडूंना जणू मैदानात येण्यावाचून रोखले आहे. तसेच पावसामुळेच मैदानातील स्पर्धा आयोजन, खेळांचा सराव, मॉर्निंग वॉकला ब्रेक लागला आहे.
- आपटेनगरातील मैदानाही ओस…
आपटेनगरातील शांती उद्याननजिकच्या मैदानात प्रामुख्याने क्रिकेट जास्ती प्रमाणात खेळले जाते. आपटेनगरातील मुले या मैदानात वर्षभर हमखास क्रिकेट खेळताना दिसतात. परंतू पावसामुळे त्यांचेही मैदानातील खेळणे थांबले आहे. त्यामुळे नाईजास्तव आपटेनगरातील मुले कॉलनीतील रस्त्यावर क्रिकेट खेळत आहेत.
- शारंग चषक फुटबॉल स्पर्धाही पावसामुळे स्थगित
गेल्या सात महिन्यापासून छत्रपती शाहू स्टेडियममध्ये गाजत असलेला फुटबॉल हंगाम पावसामुळे स्थगित ठेवला आहे. सध्या फुटबॉल हंगामातील शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुऊ आहे. इतर फुटबॉल स्पर्धांप्रमाणे ही देखील स्पर्धा रंगात आलेली असतानाच केवळ पावसामुळे ती स्थगित ठेवली आहे. जोपर्यंत मैदान वाळून सामने खेळण्यालायक तयार केले जाणार नाही, तोपर्यंत सामने होणार नाहीत, हे उघड आहे.








