‘आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे व समन्वयाने काम करावे.’
रत्नागिरी : मान्सूनमधील आपत्ती काळात जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घ्यावी. जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती निवारणासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे व समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होवू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली.
बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.
जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील पूर निवारणासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नद्यांमधील गाळ तात्काळ काढून घ्यावा. हा गाळ नदीकिनारी न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी विभागस्तरावर बैठक आयोजित करण्यात यावी. त्या आपत्ती काळात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी केल्या.
घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या शक्यतेने घ्यावी दक्षता
पावसाळ्यात दरड कोसळण्याची संभावना अधिक राहते. अशा असणाऱ्या दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. घाटामध्ये दरड कोसळून अपघात होवू नये, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश सामंत यांनी दिले आहेत.
अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढा पावसाळ्यात होर्डिंग्जमुळे अपघात होवू नयेत. यासाठी जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढून टाकावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी नगरपालिका प्रशासन विभागाला दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या होर्डिंग्जबाबत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा, असेही निर्देश सामंत यांनी दिले.
भूमिगत वीजवाहिनीची कामे वर्षभरात मार्गी लागणार
आपत्ती व्यवस्थापनातंर्गत रत्नागिरी व खेड या दोन तालुक्यात ७०३ कोटीच्या निधीतून भूमिगत वीजवाहिन्यांची कामे केली जाणार आहेत. त्या कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. त्यातील ७३ कामांचे प्रस्ताव दुरूस्तीसाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. ते प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडून मंजूर होतील.
येत्या वर्षभरात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे मार्गी लागतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथे भूमिगत वीजवाहिनीच्या उघड्या ठेवण्यात आलेल्या कनेक्शनमुळे भटक्या गुरांचा शॉक लागून मृत्यू झाला होता. अशा या घटना पाहता या कामांमध्ये जेथे अर्धवट व धोकादायक कामे झाली आहेत, त्या ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी सूचित केलेल्या ठळक बाबीः
- जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने औषधसाठा, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी या बाबत आढावा घ्यावा.
- पावसाळ्यातील साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार करावी.
- महावितरणने पावसाळ्याच्या दृष्टीने दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करावीत.
- महावितरणची अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.
- आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी मदत करणाऱ्या संघटनांचे आपत्ती व्यवस्थापन किट ठेवण्यासाठी प्रत्येक नगर परिषदेने जागा उपलब्ध करुन द्यावी.
- जिल्ह्यात १४० कोटीच्या निधीतून एकूण २५ धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची निर्मिती.
- खारलॅण्डमधून १४.७९ कोटी निधीतून ८ बंधाऱ्यांचा समावेश.
- जिल्ह्यात शेल्टर हाऊसच्या कामांमध्ये दापोली ५, खेड ५, रत्नागिरी ६, राजापूर ४ आणि संगमेश्वर १ इतक्या कामांचा समावेश.








