अनेक घरांची पडझड : 164 नागरिकांचे स्थलांतर
कारवार : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 1 हजार 273 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पावसाच्या हंगामातील ही सर्वाधिक नेंद आहे. घाटमाथ्यावरील सिद्धापूर तालुक्यात 204 मि.मी., यल्लापूर 174 मि. मी. आणि शिरसी तालुक्यात 96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सुपा (52653 क्युसेक्स), कद्रा (52752 क्युसेक्स), लिंगनमक्की (73505 क्युसेक्स) जलाशयामध्ये पाणी वाहून येत आहे. कारवार तालुक्यातील काळीनदीवरील कद्रा जलाशयातून 61135 क्युसेक्स इतके तर कोडसळ्ळी जलाशयातून 25728 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग होत आहे. मुसळधार पावसामुळे घरांची पडझड सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एक घराची संपूर्णपणे (यल्लापूर तालुक्यात) तर 28 घरांची भागश: पडझड झाली आहे. जिल्ह्यात एकूण 9 काळजी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये कुमठा तालुक्यातील 4 आणि होन्नावर तालुक्यातील 5 काळजी केंद्रांचा समावेश आहे. या काळजी केंद्रांमध्ये 164 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या गुंडबाळनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून तिरावरील नारळ सुपारीच्या बागा आणि वसती प्रदेश जलमय झाला आहे. सरकारी यंत्रणा परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहे.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रविवारी कुमठा-शिरसी दरम्यानच्या देवीमने घाटात रागीहोसळ्ळी येथे दरड कोसळून ठप्प झालेली वाहतूक सोमवारी पूर्ववत करण्यात आली आहे. अंकोला तालुक्यातून वाहणाऱ्या गंगावळीनदीने आणि कुमठा तालुक्यातून वाहणाऱ्या अघनाशिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक नाले जलमय झाले आहेत. जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शाळांना आजही सुटी
कारवार जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 1273 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्यात आज मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून बुधवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत किनारपट्टीवरील तालुक्यातील शाळांना मुसळधार पावसामुळे पाच दिवस सुटी देण्यात आली आहे.









