भात तरु कुजण्याची शक्यता : वीजपुरवठा खंडितचा धोका
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पावसाने शेतवडीत सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे भात रोपांचे तरु कुजून जात असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनले आहेत. चार दिवसांपूर्वी या भागात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील शेतीच्या कामाला प्रारंभ केला होता. भातरोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मशागत करणे. रताळी लागवड, आदी कामे सुरू होती. मात्र रविवारपासून पुन्हा या भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतवडीत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
या भागातील शेतकरी वर्ग भात पेरणीऐवजी भातलागवड मोठ्याप्रमाणात करतात. भातरोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरुची पेरणी आठ-दहा दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. काही ठिकाणी भात रोपांच्या तरुची उगवण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी तरुची बियाणे जमिनीतच आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतवडीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे भात रोपांचे तरू कुजून जात आहेत. वास्तविक पाहता या भागातील शेतकरी वर्ग जुलैपासून रोपलागवडीच्या कामांना प्रारंभ करतात. या भागात अतिवृष्टीमुळे भातरोपावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तरु कुजत असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग भात बियाण्यांना मोड काढून त्यासाठी शेतवडीची पाण्यातच आवश्यक मशागत करून दुबारपेरणी करीत असल्यामुळे रोप लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नदी-नाल्यांना पूर
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील मलप्रभा व नदी इतर नाल्यांना पूर आला असून अनेक नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शिवाय वीजपुरवठा देखील खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे.









