नदी-नाले भरले तुडुंब : शेतशिवारांबरोबर रस्त्यावरंही पाणीच पाणी
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे या भागातील नदी-नाले तुडुंब भरलेले आहेत. शेत शिवारात पाणी साचले आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सोमवारी सकाळी जोरदार पाऊस सुरू होता. तर दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र सायंकाळी पाचनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येणाऱ्या चार दिवसात तालुक्याच्या विविध भागातील संपर्क रस्त्यांवर पाणी येण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे पिरनवाडी येथील सिद्धेश्वर गल्लीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तसेच रस्त्यावरून पाणी जात होते. बेळगाव-चोर्ला रोडवरील कदमनगरनजिक गटारीचे सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. पावसामुळे पश्चिम भागाच्या किणये, संतिबस्तवाड परिसरातील मुंगेत्री नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तसेच नदीकाठाच्या शेत शिवारामध्ये अधिक प्रमाणात पाणी साचले आहे.
पावसाने कुद्रेमनी परिसरातील नाले-ओढे तुडुंब
कुद्रेमनी : शनिवार, रविवार दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाच्या दणक्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून कुद्रेमनी परिसरातील लहान मोठे नाले, ओढे पाण्याने भरून वाहत आहेत. भात शिवार भागात पाणी झाल्यामुळे भाताच्या रोप लागवडीचा हंगाम साधण्याची शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस पडेल की नाही, याची सर्वांनाच धास्ती लागून होती. ऐन पेरणी हंगामात पुरेसा पाऊस नसल्यामुळे रताळी वेलींची लागवड भूईमुग पेरणी, बटाटे लागवड, नाचणा, भाताचे तरवे टाकण्याचे काम यंदा लांबणीवर पडले होते. पंधरवाड्यापूर्वी तुरळक पावसाने पावसाळ्याची सुरुवात झाली. जमिनीत अर्धवट ओलावा निर्माण झाला होता. या अवस्थेत काय होईल ते होईल या धाडसाने शेतकऱ्यांनी रताळी बांध ओढून वेल लागवड करणे, भुईमूग पेरणी, तरवे टाकण्याचे काम हातावेगळी केली होती. मोठा पाऊस केव्हा पडणार, या प्रतीक्षेत सर्वजण होते.
सध्या शिवार भागात पाणी भरल्यामुळे भाताची रोप लागवड करण्याची कामे सर्वत्र जोरदारपणे सुरू झाली आहेत. काही भागात मोठ्या पाण्यामुळे शेतीचे बांध फुटून रोप लागवडीत अडचणीही निर्माण झाल्या आहेत. रोप लागवड परवडणारी असल्यामुळे भातपेरणी अलिकडे कालबाह्य होताना दिसून येत आहे. रोप लागवडीसाठी सध्या बैलजोडीने जमीन नांगरत व चिखल करण्याचे प्रमाण कमी झाले असून सर्वत्र पॉवर ट्रिलरने शेतवडीत चिखलाचे काम करून रोप लागवड केली जात आहे. शेतकरी कलमेश्वर मन्नोळकर याबाबत म्हणाले की, सध्या शेती करणे खूप खर्चाची बाब झालेली आहे. एका खताच्या पिशविला बाराशे ते तेराशे रुपये, ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रिलर प्रतितास कामासाठी 800 रुपये, मजुराला मजुरी अडिचशे ते तिनशे रुपयेप्रमाणे खर्च करावा लागतो. नाला किंवा ओढा पाण्याने भरून फुटला की खूप नुकसानीची परिस्थिती निर्माण होते. सगळ्या शेतकऱ्यांना एकाचवेळी शेती हंगाम आल्यामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण होत आहे.









