सावळज :
तासगाव पूर्व भागात उन्हाच्या तीव्रतेने अनेक ठिकाणी विहिरी व कुपनलिकातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. त्यामुळे काही ठिकाणी शेतीला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या होत्या. मात्र सावळज परिसरात गेली काही दिवस मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने टंचाईग्रस्त भागाला दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
सावळज परिसराला कायम दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. अनेकांनी द्राक्षबागेला टँकरने विकतचे पाणी घातले. मात्र मागील वर्षी दमदार पावसाळा झाल्याने परिसरात पाण्याचा सुकाळ झाला होता. मात्र चालू वर्षी कडक उन्हामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली होती. तर अनेक कुपनलिका कोरड्या पडल्या होत्या. टंचाईमुळे द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने पाण्याचा टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
- मशागतीचे कामे खोळंबली
यंदा पाऊस चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने बळीराजाने खरीप हंगामासाठी शेत पेरणीसाठी तयार करण्यासाठी मशागतीची कामे हाती घेतली होती. मात्र गेली आठ दिवस सावळज परीसरात मौसमी पुर्व पावसाची सरी कोसळत आहेत. या पावसामुळे शेतात चिखल झाल्याने मशागतीची कामे खोळंबली आहेत. यंदा मान्सून लवकरच येणार असल्याने बळीराजा मशागतीची कामे उरखण्यावर भर देत आहे. मात्र बळीराजाला शेताचा वापसा येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
- मेघराजांची शेतकऱ्यांवर कृपादृष्टी
तासगाव पूर्व भागात सावळज परिसर कायमच दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत आला आहे. मात्र अनेक गावे हक्काचं उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळण्याच्या प्रतिक्षेतच आहेत. ज्या काही अपुऱ्या योजना आहेत. त्यातून गरजेला पाणी मिळत नाही. तर अनेक शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे टंचाईग्रस्त शेतकऱ्यांवर वरूणराजाने कृपादृष्टीमुळे मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.








