नदी, नाल्यांची पातळी ओसरली, रोप लागवडीच्या कामाला प्रारंभ : जूनमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर गुरुवारी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात बऱ्याचवेळा सूर्यदर्शनही झाले. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी भातरोप लागवडीचे काम हाती घेतले आहे. तसेच मशागतीच्या कामानाही सुरवात झाली आहे. पाऊस ओसरल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दिवसभरात पाऊस थांबल्याने नदी, नाल्यांची पातळी झपाट्याने ओसरली आहे. तालुक्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून 588 मि. मी. पावसाची नोंद दि. 26 जूनपर्यंत झाली आहे.
जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने सुरवात केली होती. पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केली होती. त्यामुळे नदी, नाले प्रवाहीत झाले होते. मात्र शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने सुरवात केली होती. रविवारी, सोमवारी व मंगळवारी तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते. झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असून, गुरुवारी संपूर्ण दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. तसेच शेतींची कामेही सुरू झाली आहेत.
भातपीक घेण्याचे नियोजन पावसामुळे फिस्कटले
मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पाण्याच्या प्रवाहामुळे शेतात खागी पडून शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे माती खचून नुकसान झाले आहे. भात पिकांवर या पावसाचा परिणाम झाला आहे. यावर्षी जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे पेरण्या करता आल्या नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी नट्टी लावून भात पीक घेण्याचे नियोजन केले आहे.
यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस होण्याची शक्यता
यावर्षी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात 558. 40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. खानापूर शहर 357.5, बिडी 295.2, गुंजी 640 मि. मी. पावसाची नेंद झाली आहे. तर जांबोटी, कणकुंबी भागात सर्वाधिक 801.80 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने जुलै, ऑगस्ट महिन्यात पाऊस झाल्यास यावर्षी सरासरीपेक्षा जास्ती पाऊस होण्याची शक्यता आहे.









