दापोली :
तालुक्यात पावसाने भातशेतीसह भाजीपाला करणाऱ्या ६५ शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे कृषी विभागाने दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले. यामध्ये ४.२५ हेक्टर भात तर ९.९२ हेक्टर भाजीपाला क्षेत्राचा समावेश आहे.
यावर्षी मे महिन्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जूनमध्ये थोडी विश्रांती घेतल्याने पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडला. मात्र ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. याबाबत कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात ६५ शेतकऱ्यांच्या ४.२५ हेक्टर भात क्षेत्राचे व ९.९२ हेक्टर भाजीपाला क्षेत्राचे नुकसान झाले.
तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी काही ना काही कारणास्तव शेती सोडली आहे. शेतात काम करण्यासाठी न मिळणारे कामगार, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, योग्य प्रमाणात न मिळणारी नुकसान भरपाई यामुळे अनेकांनी शेतीला रामराम ठोकला आहे. आता नवीपिढी शेतीकडे न वळता मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये नोकरी निमित्त जात आहे. त्यामुळे भातशेती क्षेत्र ओसाड पडत असल्याचे ग्रामीण भागांमधून समोर आले. त्यातच निसर्गाचा प्रकोप देखील सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.








