हायपरलूप ट्रॅकच्या तंत्रज्ञानामुळे रेल्वे यंत्रणेला गती मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता भारतीय रेल्वे नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सुपरफास्टपेक्षाही वेगवान ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. नव्या ट्रेन बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने धावणाऱ्या असतील, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. हायपरलूप ट्रॅकच्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य होणार असून त्यावर भारतीय रेल्वे आणि आयआयटी चेन्नई एकत्र काम करत आहेत. हायपरलूप चाचणी ट्रॅकची अलिकडेच यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वत: नियमितपणे या कामाच्या प्रगतीची माहिती घेत आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच आपल्या चेन्नई भेटीदरम्यान आयआयटी चेन्नईच्या डिस्कव्हरी कॅम्पसला भेट देत हायपरलूप ट्रॅक आणि ट्यूबची पाहणी केली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या यशस्वी प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले. हायपरलूप ट्रेनद्वारे 300 किलोमीटरचे अंतर 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात पार केले जाईल. सध्या, आयआयटी चेन्नई कॅम्पसमध्ये 422 मीटर लांबीचा हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार आहे. येत्या काही वर्षांत हे नवे तंत्रज्ञान सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
हायपरलूप तंत्रज्ञान म्हणजे काय?
हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये, व्हॅक्यूम ट्यूब आणि त्यात एका विशेष ट्रॅकच्या मदतीने ट्रेन ताशी 600 ते 1,200 किलोमीटर वेगाने धावू शकते. सध्या जगातील मोठे देश या तंत्रज्ञानाकडे अधिक लक्ष देत आहेत. युरोपमध्ये या तंत्रज्ञानाने गाड्या चालत असून 2050 पर्यंत संपूर्ण युरोपमध्ये हायपरलूप ट्रॅकचे जाळे टाकले जाणार आहे. अशा परिस्थितीत भारतही मागे राहिलेला नाही. रेल्वे वाहतूक यंत्रणेत सतत सुधारणा करण्यावर भारताने लक्ष केंद्रीत केले असून हायपरलूप ट्रेन हे या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.









