वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत रेल्वेच्या संघाने 220 गुणासह सांघिक जेतेपद पटकाविले. दरम्यान सेनादलाने 175 गुणासह पुरुष विभागातील तर रेल्वेने 156 गुणासह महिलांच्या विभागातील विजेतेपद मिळविले. सेनादलाचा भालाफेकधारक मनू डीपी याची या स्पर्धेत 1127 गुणासह सर्वोत्तम पुरूष अॅथलिट म्हणून तसेच महाराष्ट्राची यमुना लडकत हिने 1128 गुणासह स्पर्धेतील सर्वोत्तम महिला अॅथलिटचा पुरस्कार पटकाविला.
सेनादलाचा भालाफेकधारक मनू डीपीने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना 82.06 मी. चे अंतर पार केले. तामिळनाडूच्या पुरुष धावपटूंनी पुरुषांच्या 4×100 रिलेचे सुवर्णपदक घेतले. या क्रीडा प्रकारात तामिळनाडूच्या धावपटूंनी नवा स्पर्धाविक्रम केला. ओडीशाने या क्रीडाप्रकारात 39.74 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळविले. तर तामिळनाडूच्या धावपटूंनी या क्रीडाप्रकारात 39.42 सेकंदाचा अवधी घेतला. रेल्वेच्या महिला धावपटूंनी महिलांच्या 4×100 मी. रिलेचे सुवर्णपदक मिळविताना नवा स्पर्धा विक्रम केला. त्याने 44.87 सेकंदाचा अवधी घेतला. सेनादलाच्या अभिषेक ठाकूरने 1500 मी. धावण्याच्या शैर्यतीत सुवर्णपदक घेतले. केरळच्या बिलीन जॉर्ज अँटोने पुरुषांच्या 20 किमी चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. सेनादलाच्या सर्विनने रौप्य तर सेनादलाच्या धनंजय यादवने कांस्यपदक घेतले. आंध्र प्रदेशच्या दंडीश्रीने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक तर रेल्वेच्या पूजाने 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले.









