भाविकांच्या सोयीसाठी किमान महिना आधी घोषणा हवी
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून गावी परतणाऱ्या भाविकांना आता स्पेशल रेल्वेची प्रतीक्षा लागली आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सव स्पेशल रेल्वे जाहीर करून त्यांचे बुकिंगही फुल्ल झाले. बेळगाव व हुबळीमधून गणेशोत्सवासाठी एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई-पुण्यासह बेंगळूर मार्गावर गणपती स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. नैर्त्रुत्य रेल्वेकडून दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई व बेंगळूर मार्गावर विशेष रेल्वे सोडल्या जातात. परंतु, गणेशोत्सव काही दिवसांवर असताना रेल्वे घोषित केल्या जात असल्याने त्यांना तितकासा प्रतिसाद मिळत नाही. गणेशोत्सवासाठी गावी परतणारे भाविक ट्रॅव्हल्स अथवा इतर खासगी वाहनांचे आधीच बुकिंग करतात. त्यामुळे किमान महिनाभर आधी रेल्वेची घोषणा करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. बेळगावमधील शेकडो नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, बेंगळूर, म्हैसूर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवाला हे सर्वजण गावी परततात. बेळगाव, हुबळी परिसरात गावी परतणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. रेल्वेचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे त्यांना अव्वाच्या सव्वा तिकीट दर देऊन ट्रॅव्हल्सचा प्रवास करावा लागतो. याऐवजी रेल्वेने विशेष रेल्वे सुरू केल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यशवंतपूर-बेळगाव, हुबळी-पुणे व बेंगळूर-मुंबई या मार्गांवर सुपरफास्ट हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी नैर्त्रुत्य रेल्वेकडे करण्यात आली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने लवकर घोषणा केल्यास बुकिंग करणाऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.
– अरुण कुलकर्णी (रेल्वे सल्लागार समिती माजी सदस्य)









