रेल्वेचे बुकिंग फुल्ल, विशेष रेल्वेची प्रवाशांतून मागणी
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेची सोय केली. परंतु, मुंबई व पुण्याच्या प्रवाशांचा रेल्वेला विसर पडला आहे. सध्या मुंबई ते बेळगाव दरम्यान धावणाऱ्या दोन्ही एक्स्प्रेसचे गणेशोत्सवाच्या काळात बुकिंग फुल्ल झाले असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात एखादी विशेष रेल्वेफेरी सुरू करण्याची मागणी होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात सर्वत्रच धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. सर्रास घरांमध्ये अकरा दिवसांसाठी गणराया विराजमान होतो. परंतु, किमान तीन ते चार दिवसांची सुटी घेऊन परगावी असणारे नागरिक गावी परततात. बेळगावमधील अनेकजण नोकरी, व्यवसाय, उद्योग, शिक्षणासाठी बेंगळूर, मुंबई, पुणे, हैदराबाद यासह इतर शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवाला यापैकी बरेचजण गावी परतत असतात. नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे सोडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली. परंतु, मुंबई व पुणे या मार्गावरही एखादी गणेशोत्सव स्पेशल रेल्वे सोडणे गरजेचे होते.
सध्या दि. 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान मुंबई-बेळगाव मार्गावरील सर्व रेल्वेंचे बुकिंग फुल्ल आहे. त्याचबरोबर दि. 28 ते 31 यादरम्यान बेळगाव-मुंबई मार्गावर सर्वाधिक बुकिंग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागणार आहे. सध्या उत्सवामुळे चढ्या दराने खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट वसूल केले जात असल्याने त्याऐवजी एखादी स्पेशल रेल्वे चालविण्याची मागणी होत आहे.
खासगी ट्रॅव्हल्सचे दर वाढले
गणेशोत्सवाच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरामध्ये मोठी वाढ केली आहे. एरव्ही मुंबई-बेळगाव प्रवासासाठी हजार ते बाराशे रुपये घेणारे ट्रॅव्हल्सचालक गणेशोत्सवात मात्र 2000 ते 2200 रुपये वसूल करत आहेत. हीच परिस्थिती पुणे-बेळगाव, हैदराबाद-बेळगाव मार्गांवर आहे. या मार्गावर केएसआरटीसीच्या मोजक्याच आरामदायी बस असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालकांचे फावले आहे.









