एका दिवसात 181 जणांवर कारवाई : 1 लाखांचा दंड वसूल
बेळगाव : रेल्वे तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सध्या नैर्त्रुत्य रेल्वेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी हुबळी रेल्वेस्थानकात अचानकपणे करण्यात आलेल्या तिकीट तपास मोहिमेत 181 तिकीट न काढलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अशीच मोहीम आता नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील विविध रेल्वेस्थानकात राबविली जाणार आहे. बरेच प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. त्याचबरोबर अनधिकृतरित्या सामानाची वाहतूक तसेच तिकिटांची देवाण-घेवाण असे प्रकार समोर आले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी 12 तास 23 तिकीट तपासणी व 10 आरपीएफ कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली. यामधून एकत्रितरित्या 1 लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तपासणी मोहीम राबविण्यात आल्याने दुसऱ्या दिवशी तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते मे 2025 मध्ये हुबळी विभागाने तिकीट तपासणीतून 2.17 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेचे म्हणणे आहे. कोणत्याही प्रवाशाने तिकीट न काढता प्रवास करू नये अन्यथा कारवाईचा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे.









