भंगार विक्री आणि तिकिट दंडातून रेल्वे मालामाल
प्रशांत नाईक मिरज
मध्य रेल्वे पुणे विभागाने उत्पन्नाचे रेकॉर्ड यंदा मोडीत काढले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी विविध विभागांच्या महसूल संकलनात पाच ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भंगार विक्री आणि तिकिट दंडातून मिळालेल्या महसूलातून रेल्वे मालामाल बनली आहे. प्रवाशी सेवा सुविधांसह महसूल वाढीच्या दृष्टीने रेल्वेकडून प्रयत्न केले जात असल्याने रेल्वे फायद्यात असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्नात मध्य रेल्वेचा पुणे विभाग अव्वलस्थानी आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागाने दक्षिण-पश्चिम मार्गावर विशाल जाळे विस्तारले आहे. लाखोंच्या संख्येने प्रवाशी रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देताना दिसत आहेत. कोल्हापूर, मिरज, पुणे मार्गावर दररोज शंभरावर गाड्यांच्या नियमित फेऱ्या सुरू असून, लाखो प्रवाशी नियमित प्रवास करीत असतात. बहुतांशी रेल्वे गाड्यांच्या जनरल बोगी कमी कऊन वाढीव उत्पन्नासाठी आरक्षित डब्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे काही प्रवाशी गाड्या वगळता आरक्षित रेल्वे गाड्याही नेहमीच हाऊसफुल्ल असतात.
नोव्हेंबर महिन्यात प्रवाशी वाहतुकीतून 99.76 कोटी ऊपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच मासिक लक्ष्य ओलांडून 5.5 टक्के जास्त महसूलाची भर पडली आहे. त्यामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा 9.9 टक्केची वाढ नोंदवली गेली. दिवाळी सणाच्या काळात सुट्ट्यांमुळे हजारो प्रवाशांनी पर्यटनाचा बेत आखला होता. याच काळात रेल्वेने विशेष गाड्या चालविल्या. याशिवाय सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व गाड्यांना प्रवाशांची गर्दी होती. याचाच फायदा रेल्वेला झाला असून, आरक्षित तिकिटांतून जातीत जास्त उत्पन्न मिळाले आहे.
याशिवाय वस्तूंच्या मालगाड्यांची वाहतूक करून 31.11 कोटी ऊपयांचा महसूल मिळवला. ज्या अंतर्गत ऑटोमोबाईल्स, पेट्रोलियम पदार्थ आणि साखरेच्या मालगाड्यांची वाहतूक करण्यात आली आहे. नियमित माल वाहतुकीतून रेल्वेला घसघशीत उत्पन्न मिळते. कोरोना कालावधीत प्रदिर्घ टाळेबंदीमुळे माल वाहतुकीला फटका बसला होता. मात्र, कोरानानंतर त्यात पुन्हा वाढ झाली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी रेल्वेतून माल वाहतुकीला प्राधान्य दिल्याने गुडस् सर्व्हीसमधूनही रेल्वेला चांगले उत्पन मिळताना दिसत आहे.
याशिवाय रेल्वे पार्सल सेवेतून 2.46 कोटी आणि विविध वाणिज्य विभागातून 1.57 कोटी ऊपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे पुणे विभागाने नोव्हेंबर महिन्यात एकूण 143.69 कोटी महसूल संकलीत केला आहे. झीरो स्क्रॅप धोरणातून टेंडर प्रक्रियेद्वारे विक्री होणाऱ्या भंगारातूनही मध्य रेल्वे विभाग मालामाल झाला आहे. सप्टेंबरपर्यंत सहा हजार, 86 मेट्रीक टन ऊळ, नऊ लोकोमोटीव्ह, 160 कोच आणि 61 वॅगन्स भंगारात घालण्यात आले. यामधून रेल्वेला तब्बल 150.81 कोटी ऊपयांचा महसूल मिळाला आहे.
तिकीट तपासणी कारवाईत नोव्हेंबर महिन्यात 3.09 कोटी ऊपयांचा महसूल प्राप्त झाला. मासिक लक्ष्य ओलांडून 28.8 टक्के जास्त महसूलाची नोंद झाली. तर मागील वर्षीच्या तुलनेत 57.7 टक्केची वाढ नोंदवली गेली. अन्य विविध कोचिंग कार्यांद्वारे 11.25 कोटी ऊपयांचा महसूल प्राप्त झाल. त्यामध्येही गतवर्षीपेक्षा 30.3 टक्केची वाढ झाली, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रयत्नशील
उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. संघटीत प्रयत्नातूच उत्पन्न वाढ होत आहे. रेल्वे प्रशासनासाठी ही समाधानाची बाब आहे.
डॉ.रामदास भिसे- जनसंपर्क अधिकारी