प्रवासी रेल्वेमध्ये अनेकदा ऑफसिझनमध्ये एसी कोचेसमधून प्रवाशांची संख्या अत्यंत कमी असते. कित्येकदा तर एसी डबे रिकामे न्यावे लागतात. यामुळे रेल्वेला आर्थिक हानी सोसावी लागते. कित्येकदा केवळ एक प्रवासी एका डब्यात असतो, पण त्याला तिकीट दिलेले असल्याने त्याला त्याच्या गंतव्य स्थानी घेऊन जाण्याचे उत्तरदायित्व रेल्वेला निभावावेच लागते. अशा आर्थिक तोटय़ात जाणाऱया एसी डब्यांचे काय करायचे? हा रेल्वेला अनेक वर्षांपासून पडलेला प्रश्न आहे.

भारतीय रेल्वे व्यवस्थापनाने यावर नुकताच एक कल्पक उपाय शोधून काढला आहे. ज्या खाद्यपदार्थांची वाहतूक करताना एसीची आवश्यकता असते, अशा पदार्थांची वाहतूक या प्रवासी डब्यांमधून करण्याची योजना क्रियान्वित करण्यात आली आहे. चाकलेट किंवा तत्सम खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी थंड हवेची आवश्यकता असते. अन्यथा हे पदार्थ बिघडू शकतात. अशा पदार्थांची वाहतूक प्रवासी रेल्वेच्या एसी डब्यांमधून केल्यास रेल्वेला चांगले उत्पन्नही मिळू शकते आणि प्रवासी रेल्वेगाडय़ा अधिक वेगाने धावत असल्याने तसेच त्यांना वाटेत अडथळे फारसे नसल्याने ही वाहतूक लवकरही होते, असे रेल्वेला आढळून आले आहे. त्यामुळे आता एसी डब्यांमधून खाद्यपदार्थांची वाहतूक करण्याच्या योजनेला अधिक व्यापकत्व दिले जाणार आहे. यामुळे रेल्वेची एक मोठी आर्थिक समस्या दूर होऊ शकेल, असे व्यवस्थापनाचे मत आहे.









