सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. मजा रेल्वेच्या सोलापूर विभागातील तिलाटी रेल्वे स्टेशनच्या मालवाहतुकीच्या गुड्स शेडमधून एप्रिल आणि मे या दोन महिन्यात साखरेच्या दोन रेकमधून 5 हजार 360 मेट्रिक टन साखर तामिळनाडूतील नेल्लीकुप्पम येथे पाठविली. यातून सोलापूर विभागाला ७०.०४ लाखांचा महसूल मिळाला. भविष्यात तिलाटी रेल्वे स्टेशन येथील मालवाहतुकीच्या गुड्स शेडमधून निश्चित असलेल्या आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
सोलापूर हे राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन होते. या धोरणात्मक विकासामुळे स्टेशनच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील कार्यरत असलेल्या अनेक साखर कारखान्यांचा त्यांचा साखरेचा माल देशाच्या विविध भागात कार्यक्षमतेने पोहचवता येईल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. तामिळनाडूसारख्या दूरच्या राज्यात रेल्वेमार्गे थेट साखर पोहोचवणे हे एक मोठे यश मानले जात आहे. सोलापूर रेल्वे विभागाच्या सहकार्याने साखर पाठवविणे शक्य झाले. रेल्वे प्रशासनाने तिलाटी येथे विशेष माल चढाई व्यवस्था, लोडिंग डॉक, यांत्रिकी सहाय्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. या मालगाडी सोडल्यानंतर रेल्वेच्या कामगिरीबद्दल व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सोलापूर विभाग व्यापाऱ्यांना विशेषतः साखर कारखान्यांना त्यांच्या मालाची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित व्हावी यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर विभागातील तिलाटी रेल्वे स्टेशन येथून गुड्स शेडमुळे साखर लोडिंग शक्य झाले आहे. यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात दोन रेकमधून तामिळनाडू राज्यात साखर पाठविली. यातून सोलापूर विभागाचा महसूल वाढेल. तसेच सोलापूर विभागाची कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता मालवाहतूक सेवेद्वारे पायाभूत सुविधा वाढविण्यास आणि प्रादेशिक उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.
– योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
- तामिळनाडूतील साखर बाजारपेठ
तामिळनाडूमध्ये साखरेची मोठ्या प्रमाणावर मागणी असून, तेथील खाद्यप्रक्रिया उद्योग, मिठाई उत्पादक कंपन्या आणि थेट ग्राहक बाजारपेठांमध्ये सोलापूरच्या साखरेला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात साखर पाठवणीतून सोलापूरच्या साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.








