स्थानकांच्या नाव-ठिकाणाबाबतचा संभ्रम दूर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे नवनवीन सुविधा पुरवते. आता स्थानकाचे नेमके नाव शोधण्यासाठी आणि तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रिय क्षेत्रे/शहरांसह लहान स्थानके ओळखण्यासाठी रेल्वेने स्थानकाच्या नावाशी लोकप्रिय क्षेत्रे जोडण्याची एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. या नवीन सुविधेमुळे पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम प्रवास नियोजन आणि तिकीट बुकिंगचा चांगला अनुभव मिळणार आहे.
भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना आता सहज तिकीट बुक करता येणार आहे. या वैशिष्ट्यामध्ये प्रसिद्ध क्षेत्रे संबंधित स्थानकाच्या नावांशी जोडण्यात आली आहेत. या सुविधेमुळे योग्य बुकिंग स्टेशन शोधणे सोपे होईल. सध्या रेल्वेने 175 लोकप्रिय शहरे आणि निटकच्या 725 संबंधित स्थानकांची नावे अपडेट केली आहेत. त्यानुसार नवी दिल्ली हे स्थानक निवडायचे असल्यास त्या ठिकाणचे सर्वात जवळचे स्टेशन कोणते आहे हेदेखील दिसणार आहे. वेबसाईट किंवा अॅपवर तुम्ही नवी दिल्ली टाइप करताच, तुमच्यासमोर नवी दिल्लीतील सर्व स्थानकांची यादी येईल. त्यानंतर दिल्लीतील किर्तीनगरला जायचे असल्यास केवळ किर्तीनगर हा पर्याय निवडता येईल. तसेच एखाद्या प्रवाशाला वैष्णोदेवी, बद्रीनाथ किंवा नोएडा यासारख्या लोकप्रिय ठिकाणांना भेट द्यायची असल्यास तिकीट बुकिंग करताना आपोआप जवळचे रेल्वेस्टेशनही दर्शवेल. नवीन प्रणाली लागू झाल्यामुळे भोपाळ, दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहराचे नाव टाईप करणाऱ्या प्रवाशास त्या ठिकाणाजवळील महत्त्वाच्या स्थानकांची यादी मिळाल्यामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी होईल.









