सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा; स्थानकांना जोडरस्त्यांच्या काँकिटीकरणासह स्थानकांवर सुसज्ज पोलीस ठाणीही उभारणार
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात -लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या 7 दिवसांत सुरु करा तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते क्राक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुकवारी दिले. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.
कोकण रेल्वेस्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱया रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुकवारी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व रेल्वे पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबई-कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. परंतु या हजारो प्रवाशांना रेल्वेस्थानकांवर तसेच या परिसरात कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नेहमीच विविध हालअपेष्टांना समोर जावे लागते. काही प्रमुख रेल्वेस्थानकांचा अपवाद वगळता कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे ही सर्व रेल्वेस्थानके लवकर सुसज्ज करावीत तसेच, या प्रक्रियेस विलंब न लावता येत्या 7 दिवसांत या बाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. त्याप्रमाणे रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनऐवजी दादर रेल्वेस्थानकापर्यंत करण्याबाबत तसेच सावंतवाडी-तुतारी एक्सप्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिले. कोरोना काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वेस्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
या बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे. एस. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एन. राजभोज, एस. एन. गायकवाड, ए. ए. ओटवणेकर, ए. एम. रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे डिसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.