कोल्हापूर :
मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी रेल्वे स्टेशन येथे अमृत योजनेतून 43 कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या स्टेशनच्या नुतनीकरणाच्या विकासकामांची पाहणी केली. अपेक्षित गतीने कामे होत नसल्यावरून त्यांनी ठेकेदाराची खरडपट्टी केली. दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
कोल्हापूर रेल्वे स्थानकाची सोमवारी सकाळी दोन तास रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी पाहणी केली. तिकीट खिडकी, प्रतिक्षालय, प्लॅटफार्म क्रमांक चार येथे सुरू असलेली कामे, लिफ्ट, एक्स्लेटर, मंडईच्या बाजूची तिकीट खिडकी आदींची पाहणी केली. मागील दौऱ्यावेळी दुबे आल्या असता त्यांनी नुतनीकरणाची कामाची पाहणी केली होती. अपेक्षित गतीने ही कामे होत नसल्यावरून त्यांनी ठेकेदारास धारेवर धरले. स्थानकावर सुरू असलेल्या कामांची गती वाढवा, प्रत्येक कामांसाठी मुदत निश्चित करा, त्यानूसार नियोजन करा. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदाराला दिल्या. रेल्वे स्टेशनच्या कामकाजाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे हँड पाँईटसह शंटीगच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वेचे पुणे व कोल्हापूर येथील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर–मिरज दुहेरीकरणासाठी रेल्वे बोर्डकडे नजरा
वंदे भारत मुंबईपर्यंत सुरू करण्यासह अन्य नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी कोल्हापूर–मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे. याबाबत पत्रकारांनी दुबे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, कोल्हापूर–मिरज दुहेरीकरणाचा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. मात्र, त्यावर अद्यापी कोणतीही नवीन आदेश प्राप्त झालेले नाही.
कोल्हापूर–वैभववाडी सर्व्हेक्षण पूर्ण, प्रतिक्षा पुढील आदेशाची
कोल्हापूर–वैभववाडी मार्गाबाबत विचारले असता दुबे म्हणाल्या, कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर झाला असून सर्व्हेक्षणही झाले आहे. मात्र, या मार्गाबाबतच्या कोणत्याही सूचना पुणे विभाग प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.
रेल्वेस्थानकात नव्या पीटलाईनचा विचार
स्थानकावरील उपलब्ध जागेचा विचार करता आणखी एक पीटलाईन उभारता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यानूसार त्यादूष्टीने पाहणी करा, नियोजन करा, अशा सूचनाही दुबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.








