गोगटे उ•ाणपुलावरही वाहनचालकांना अंधाराचा धोका
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातून वाट काढत ये-जा करावी लागत आहे. पोस्टमन सर्कल ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर मागील अनेक महिन्यांपासून पथदीप बंद आहेत. रात्रीच्यावेळी अंधार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात ये-जा करावी लागते. रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असल्याने पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने रस्ते, दुभाजक चकाचक करण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी पथदीप बंद होते, ते सुरू करण्यात आले. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वेस्टेशन परिसरात पथदीप बंद आहेत. पोस्टमन सर्कल ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रेल्वेतून उतरलेले प्रवासी मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे पथदीप बसविणे गरजेचे आहेत.
गोगटे उड्डाणपुलावरही अंधाराचे साम्राज्य
गोगटे उड्डाणपुलवर मागील अनेक महिन्यांपासून पथदीप बंद आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड, महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत वादामुळे पथदीप सुरू करण्याकडे कोणत्याच विभागाचे लक्ष नाही. यामुळे अंधारातून नागरिक ये-जा करत आहेत. उड्डाणपुलवर अनेक अपघात घडूनही प्रशासनाला शहाणपणा आलेले नाही. किमान अधिवेशनकाळात तरी पथदीप सुरू करा म्हणण्याची वेळ आली आहे.
पथदीप सुरू करा -रणजित चव्हाण पाटील (माजी नगरसेवक)
पोस्टमन सर्कल ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर मागील अनेक महिन्यांपासून पथदीप बंद आहेत. अनेकवेळा कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असल्याने पथदीप सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









