केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडून टीका
बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. बेळगाव व धारवाड जिल्ह्यातील 1200 एकर जमिनीचे संपादन केले जात आहे. यापैकी 40 ते 42 एकर जमीन भूसंपादन तांत्रिक कारणामुळे रखडली आहे. यासाठी 937 कोटी रुपयांची रेल्वेने तरतूददेखील केली आहे. भूसंपादन, तसेच कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. परंतु, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे रेल्वे प्रकल्प रखडत असल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी कामगारमंत्री संतोष लाड यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या केली.
बेळगावमधील रेल्वे विकासकामांना गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा सोमवारी बेळगाव रेल्वेस्थानकात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. याबरोबरच मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रेल्वेप्रवास वेगाने सुरू झाला आहे. खानापूर येथील नागरिकांची 50 वर्षांची मागणी पूर्ण झाली असून तेथेही कामाला गती मिळाली आहे. बेळगावमधून वंदे भारतच्या स्लिपिंग कोचची मागणी होत असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
कर्नाटकातील 66 रेल्वेस्थानकांचा विकास
रेल्वेस्थानकांचा विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत योजना लागू केली. देशभरातील 1200 रेल्वेस्थानकांचा विकास या योजनेतून केला जात आहे. त्यामध्ये कर्नाटकातील 66 रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. बेळगावसह घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, गोकाक, सांबरा या रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. लिफ्ट, सरकता जिना, फूटओव्हरब्रिज यासह इतर सुविधा केल्या जात आहेत. यावेळी खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांसह नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागीय व्यवस्थापक बेला मीना, प्रिन्सिपल चिफ कमर्शियल मॅनेजर एस. पी. शास्त्राr, अजय शर्मा, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, भाजप महानगर अध्यक्ष गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.









