कोल्हापूर :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस समोरील रस्ता पूर्ण खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांना खड्ड्यातून जावे लागते. कोल्हापूरात आलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर पडल्यावर प्रथम खड्ड्यांचे दर्शन होते. पाठोपाठ मुख्य प्रवेशद्वारासमोर बसलेले भिकारी स्वागताला असतात. स्थानकाच्या आत प्लॅटफॉर्मवर साफसफाई होत असली तरी म्हणावी तितकी स्वच्छता दिसून येत नाही. मुळात येथील कर्मचाऱ्यांनाच मूलभूत सुविधा नाहीत. तिथे प्रवाशांची कोण दखल घेणार, असे चित्र पहायला मिळाले.
कोल्हापूर रेल्वेस्थानक ऐतिहासिक आहे. पण त्याचे महत्व रेल्वे प्रशासनाला राखता येत नाही, हे दुर्देव आहे. कोल्हापूर रेल्वेस्थानक मॉडेल रेल्वेस्थानक करण्यच्या घोषणा अनेक वेळा झाल्या, पण त्या घोषणाच ठरल्या. गेल्या काही वर्षात कोल्हापूर–मिरज रेल्वेचे विद्युतीकरण झाले. पण कोल्हापूर–मिरज मार्गाचे दुहेरीकरण आणि कोल्हापूर–कोकण रेल्वे मार्ग जोडणे ही कामे झाली नाहीत.
रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सुविधा मिळणे अपेक्षित आहे. पण या स्थानकावर सुविधा मिळणे दूर स्थानकाबाहेरील चित्र दिसल्यावर स्थानकात जायचे की नाही, असा प्रश्न पडतो. पूर्वेकडे जुने शाहूपुरी पोलीस स्टेशन ते पश्चिमेकडे पोस्ट कार्यालयापर्यंत रेल्वेची जागा आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोरुन वाहनांची रहदारी होते. पण हा मुख्य रस्ताच खराब झाला आहे. रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना मात्र प्रथम येथील खड्ड्यांचे दर्शन होते. त्यानंतर रिक्षात बसल्यावर खड्ड्यांचा अनुभव घेत जावे लागते. सर्व आवारात दलदल निर्माण झाल्याची दिसून आले.
- आरपीएफ, लोहमार्ग पोलीस चौकी खुराड्यात
सध्या टर्मिनन्सचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. अंतर्गत कामापेक्षा स्थानकाच्या बाहेरील दर्शनी भागासाठीच जास्तीत जास्त निधी खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पण ज्या ठिकाणी मुख्य कामकाज चालते, ती कार्यालये खुराड्यातच आहेत. त्यापैकी तिकीट निरीक्षक, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस चौकी आहे. या कार्यालयात पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास बसायला जागा नसते अशी अवस्था आहे. नूतनीकरणांतर्गत या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
- प्रतीक्षालयात कायम अस्वच्छता
रेल्वेच्या प्रवाशांसाठी स्थानकात प्रतीक्षागृह आहे. रेल्वे उशिरा असल्यास प्रवासी या प्रतीक्षालयात थांबतात. पण प्रतीक्षालयातील स्वागत गृह कायम अस्वच्छ असते. सफाई कर्मचारी असून येथील स्वागत गृहात गलिच्छपणा दिसून आला. पण नाईलाजाने प्र्रवाशांना या स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे.
- नूतनीकरणाच्या कामाला विलंब
अमृत भारत रेल्वेस्थानक पुनर्विकास योजनेतून कोल्हापूर रेल्वेस्थानकासाठी 42 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म एकच्या समोर असलेली जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन मोठी इमारत उभारण्यात येत आहे. पण हे काम संथगतीने सुरु आहे. मुख्य आरक्षण केंद्रातील कामही अपूर्ण आहे. या कामासाठी लागणारे साहित्य स्थानकाच्या आवारात अस्ताव्यस्त पडले आहे.
- लिफ्ट, सरकता जिना सुरु
प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी स्थानकावर उड्डाणपूल आहे. पण लिफ्ट आणि सरकता जिन्याची सुविधा आहे. लिफ्ट आणि सरकता जिना दोन्ही सुरु आहेत, ही रेल्वे प्रशासनाची जमेची बाजू आहे.
- एकाही गाडीत स्वच्छता नाही
कोल्हापूर रेल्वेस्थानकातून रोज 11 रेल्वे सुटतात. दोन साप्ताहिक रेल्वे आहेत. त्यामुळे सर्व गाड्यांची संख्या 13 होते. पण सर्वच रेल्वे गाड्यामध्ये नेहमी गर्दी असते. पण स्वच्छता कुठेही आढळत नाही. प्रवाशीही खाद्यपदार्थांचे वेष्टण, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या कुठेही टाकतात. स्वागतागृहात पाण्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे तिथेही अस्वच्छता आणि दुर्गंधी असते.
- प्रवाशांची गैरसोयच
कोल्हापुरातील नोकरदारांची संख्या मुंबईत मोठी आहे. शनिवारी हे नोकरदार मुंबईतून महालक्ष्मी एक्सप्रेसला बसतात. पण आरक्षण करुनही स्थानिक प्रवाशांच्या दादागिरीमुळे त्यांना ठाण्यापर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे एक्सप्रेस गाडयामधील स्थानिक प्रवाशांची घुसखोरी प्रशासनाने बंद करण्याची गरज आहे. तसेच बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस लवकर सुरु करण्याची करावी.
–सुहेल जमादार, रेल्वे प्रवासी








