सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणेंचे लक्ष सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधा, याठिकाणी अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, अमृत भारत योजना आदी विषयांकडे वेधले. पालकमंत्री श्री.राणे यांनी हा विषय खासदार नारायण राणे स्वतः हाताळत असून यावर ते लक्ष ठेवून आहेत, लवकरच सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच हा विषय खासदार साहेबांना माझ्या परीने देखील सांगेन, असा शब्द पालकमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच सावंतवाडीच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत असेही त्यांनी नमूदकरत पालकमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्या नीट समजून घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केले, यावेळी उपस्थित प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले.यावेळी प्रवासी संघटनेचे सल्लागार श्री.सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते.









