कळंबस्ते : रेल्वे फाटक बिघाडामुळे वाहनांची गर्दी
चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते रेल्वे फाटकात शनिवारी सकाळी 9 वाजता मालगाडी निघून गेल्यानंतर दोन्ही बाजूला असलेले फाटक तांत्रिक बिघाडामुळे वर होत नव्हते. बराच काळच्या प्रयत्नानंतर प्रवाशांनीच हाताने उचलून ते वर केले. अर्धा तास विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
फाटकातील तांत्रिक बिघाडाचे सत्र कायम असून 5 महिन्यांतील हा तिसरा प्रकार आहे. जागतिक स्तरावर आपले प्रगत तंत्रज्ञान पोहचवत अभिमानाने मिरवणाऱ्या कोकण रेल्वेला हे फाटक मात्र दुरुस्त होईनासे झाले आहे.
यापूर्वी 22 फेब्रुवारीनंतर 4 मार्चला रेल्वे फाटक तांत्रिक बिघाडामुळे न पडल्याने मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस काही काळ थांबवावी लागली होती. त्यानंतरच्या दुरुस्तीनंतर चार महिने सुरळीत गेल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा असाच प्रकार घडला आहे.
सकाळची दिल्लीला जाणारी मंगला एक्प्रेस निघून गेल्यानंतर थोड्यावेळाने मालगाडीही येथून मार्गस्थ झाली. मात्र याचदरम्यान खाली आलेले फाटक काही केल्या वर उचलत नव्हते. काही वेळेला थोडे वर आल्यावर मध्येच अडकत होते. त्यातूनच काही वाहनचालक पुढे जाऊन थेट पटरीवरच थांबत होते. फाटक वर-खाली होणे सुरुच होते.
या दरम्यान कळंबस्ते-धामणंद मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. प्रयत्न करुनही फाटक वर उचलले जात नसल्याने शेवटी प्रवाशांनीच हाताने उचलून फाटक वर नेले आणि वाहनांचा मार्ग मोकळा केला. यामध्ये अर्ध्या तासाहून अधिक वेळ वाया गेल्याचे तेथे उपस्थित असलेले कळंबस्तेचे उपसरपंच गजानन महाडिक यांनी सांगितले.
व्हिडीओ पोलिसांना पाठवले.
कळंबस्ते रेल्वे फाटकातील तांत्रिक बिघाडाचे सत्र काही केल्या थांबत नाही. शनिवारी पुन्हा प्रकार घडल्यानंतर आणि प्रवासी वाहनचालकांना त्याचा त्रास झाल्यानंतर बिघाडामुळे वर-खाली होणारे फाटक, झालेली वाहतूककोंडी याबाबतचे व्हिडीओ पोलिसांनाही पाठवण्यात आले आहेत.
उद्या एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच खबरदारी घेण्याच्या दृष्टीने आणि सध्याची फाटकाची स्थिती पोलिसांनीही कळावी म्हणून व्हिडीओ पाठवण्यात आल्याचे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी सांगितले.