दक्षिण बाजूनेही करता येणार प्रवेश : रेल विकास निगमच्या माध्यमातून विकासकामे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीखातर फूट ओव्हरब्रिज उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्लॅटफॉर्मची संख्या वाढणार असल्याने त्या पद्धतीने फूट ओव्हरब्रिज तयार करण्यात आला आहे. स्थानकाच्या दक्षिण बाजूने येणाऱया प्रवाशांनाही थेट रेल्वेस्थानकात फूट ओव्हरब्रिजमुळे येता येणार आहे. पुढील काही दिवसांत फूट ओव्हरब्रिजचे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत असून ऐतिहासिक रेल्वेस्थानकाला नवे रूप दिले जात आहे. रेल्वेस्थानकावर नवी इमारत बांधण्यात आली असून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अनेक बदल करण्यात आले आहेत. रेल विकास निगमच्या माध्यमातून विकास केला जात आहे. रेल्वेस्थानकाला दक्षिण बाजूनेही प्रवेशद्वार केले जात आहे. शास्त्रीनगर येथून हे दक्षिण प्रवेशद्वार असणार आहे. यासोबत कोचिंग डेपो उभारण्याचे काम सुरू आहे. यार्ड, रिमोल्डिंगअंतर्गत प्लॅटफॉर्म क्र. 4 ची निर्मिती केली असून फूट ओव्हरब्रिज तयार करण्यात येत आहे.
अंदाजे 80 कोटी रुपये खर्च
यार्ड रिमोल्डिंगसाठी अंदाजे 80 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 तयार करण्यात आला असून प्रवाशांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी फूट ओव्हरब्रिज उभारण्यात येत आहे. मागील दीड-दोन महिन्यांपासून हे काम सुरू आहे. प्रारंभी पेनच्या साहाय्याने खांब उभे करण्यात आले होते. त्यानंतर आता हळूहळू एक-एक भाग जोडण्यात येत आहे. सध्या या फूट ओव्हरब्रिजवर पत्रे बसविणे व इतर काम केले जात आहे.









